एकदा यवत, आता भिगवण! राहुल कुल यांच्यावर संशयाची सुई का?

Rahul Kul : एका बाजूला सत्तेचे राजकारण आणि दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी घटनांची मालिका. या दोन्हीच्या केंद्रस्थानी सध्या दौंडचे आमदार राहुल कुल

  • Written By: Published:
Rahul Kul

Rahul Kul : एका बाजूला सत्तेचे राजकारण आणि दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी घटनांची मालिका. या दोन्हीच्या केंद्रस्थानी सध्या दौंडचे आमदार राहुल कुल यांचे नाव चर्चेत आले आहे. भिगवण येथील कथित अपहरण प्रकरण असो किंवा यवत येथील वादग्रस्त घटना, आमदार कुल यांच्याभोवती संशयाचे जाळे विणले जात आहे. पण, या आरोपांमध्ये तथ्य किती? हा खरा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भिगवण येथील घटनेने संपूर्ण पुणे (Pune) जिल्हा हादरला होता. एका 21 वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याचा आरोप झाला. आई आणि भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून मुलीला पळवून नेल्याचा दावा कुटुंबाने केला. परंतु, अवघ्या काही तासांतच या प्रकरणाने अनपेक्षित वळण घेतलं. त्या तरुणीने व्हिडिओद्वारे आपण मर्जीने आणि प्रेमसंबंधातून गेल्याचं जाहीर केलं. ज्या अझर शेख याच्यावर अपहरणकर्त्याचा चुलता म्हणून आरोप झाला, त्याने व्हॉट्सॲपवर राहुल कुल (Rahul Kul) यांचा फोटो ठेवला होता. याच एका ‘स्टेटस’ वरून आमदार कुल यांच्यावर थेट आरोप करण्यात आले.

या आरोपांना उत्तर देताना आमदार राहुल कुल यांनी अत्यंत सावध आणि ठाम भूमिका घेतली. माझ्याही घरात मुली आहेत, महिला पदाधिकारी आहेत; त्यामुळे महिलांवरील अन्यायाची मला जाणीव आहे, असे सांगत त्यांनी हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले. ज्या मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केले, त्यांच्याशी आपण सुरुवातीपासूनच संपर्कात असल्याचे कुल यांनी सांगितले.

पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्याचा दावा त्यांनी केला असून, दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे. केवळ एका स्टेटसच्या आधारे जबाबदारी निश्चित करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दुसरीकडे भिगवण (Bhigwan Case) आणि यवत (Yavat Case) प्रकरणावरून सध्या आमदार राहुल कुल यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवलीय. एकापाठोपाठ एक दोन घटनांमध्ये कार्यकर्त्यांची नावे आल्याने, ‘आमदारांचा वरदहस्त’ असल्याचा आरोप करत त्यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यवतमध्ये जेव्हा दोन समाजांत ठिणगी पडली होती, तेव्हा राहुल कुल यांनी राजकारण करण्याऐवजी अत्यंत संयमी आणि समन्वयाची भूमिका घेऊन परिस्थिती शांत केली होती, हे विसरून चालणार नाही. विशेष म्हणजे, अगदी तशीच नि:पक्षपाती भूमिका ते आता भिगवण प्रकरणातही घेत आहेत.

शहराच्या दररोज पाणीपुरवठ्यासाठी पक्ष बाजूला ठेवून सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज : राहुल कलाटे

सध्या हे प्रकरण बारामती कोर्टात (Baramati Court) पोहोचले असून नातेवाईकांनी कुल यांच्या विरोधात घोषणाबाजी करून संताप व्यक्त केलाय. दुसरीकडे, आमदार कुल यांनी पोलिसांना निष्पक्ष चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. ही प्रेमप्रकरणाची साधी घटना आहे की यामागे खरोखरच मोठी राजकीय खेळी दडली आहे? हे आता पोलीस तपासातच स्पष्ट होईल. मात्र, या घटनांमुळे राहुल कुल यांच्या राजकीय प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून जोमाने सुरू झाले आहेत, हे निश्चित!

follow us