पुण्यात DJ वरून धंगेकर-बापट आमनेसामने; सणांवर बंदी आणणार का? तुम्हाला क्रांती घडवायची असेल तर…
आज DJला विरोध केला तर उद्या इतर सणांवरही बंदीची मागणी होऊ शकते, असा टोला त्यांनी बापट यांना लगावला.
पुण्यात गणेशोत्सवातील DJच्या मुद्द्यावरून (Pune) वातावरण चांगलंच तापलं आहे. गणेशोत्सवात DJला परवानगी असावी की नाही, यावरून वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत. विद्यानंद बापट यांनी DJला विरोध करत नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी DJच्या समर्थनार्थ भूमिका मांडत बापट यांच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केला. वृत्तवाहीनीच्या चर्चेत दोघांमध्ये याच मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली.
धंगेकर यांनी लोकभावनेतून निर्माण झालेल्या सणांवर बंधनं घालण्याच्या भूमिकेला विरोध केला. आज DJला विरोध केला तर उद्या इतर सणांवरही बंदीची मागणी होऊ शकते, असा टोला त्यांनी बापट यांना लगावला. कुंभमेळा आणि नवरात्रासारख्या सणांवरही बंदीची मागणी केली जाईल का, असा सवाल करत त्यांनी सण आणि उत्सवांवरील निर्बंधांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला.
पूर्वी नास्तिक नव्हता, पण परिस्थितीनुसार…; विद्यानंद बापटांबद्दल वडिलांनी सांगितली खास गोष्ट
धंगेकर यांच्या आरोपांना उत्तर देताना बापट यांनी DJसोबतच ढोल-ताशांच्या आवाजाचाही विचार करण्याची गरज असल्याचं सांगितलं. केवळ परंपरेच्या नावाखाली मोठ्या आवाजाचं समर्थन करता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. DJ किंवा लाऊडस्पीकर हा देशासमोरील मोठा प्रश्न नसल्याचं सांगत धंगेकर यांनी बापट यांच्या भाषाशैलीवरही टीका केली. बापट अलंकारिक मराठीचा वापर करून स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, DJ आणि डॉल्बी ही आपली परंपरा नसून सणांवर बंदी घालण्याची आपली भूमिका नसल्याचं बापट यांनी स्पष्ट केलं. मात्र उत्सवाच्या नावाखाली नागरिकांना त्रास होत असेल तर तो त्यांनी का सहन करावा, असा थेट सवाल त्यांनी केला. यावर धंगेकर यांनी बापट यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गणेशोत्सवातील DJच्या मुद्द्यावरून पुण्यात आता केवळ आवाजाची चर्चा न राहता परंपरा, नागरिकांचा त्रास आणि उत्सवावरील निर्बंध यावरून राजकीय वादही रंगताना दिसत आहे.