अंगणवाडी सेविकांना खूशखबर! मिळणार 1 कोटी 92 लाख रुपयांचा प्रोत्साहन भत्ता..

Pune News : राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. बहिणींना काही हप्तेही मिळाले आहेत. आता बहिणींचा अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील सुमारे चार हजार अंगणवाडी सेविकांना एक कोटी 92 लाख रुपयांचा निधी दिला आहे. हा भत्ता येत्या काही दिवसांत अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महायुती सरकारने निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांमार्फत करण्यात आले. अर्ज भरण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम केले. प्रत्येक अर्जासाठी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता संबंधित कर्मचाऱ्यांना देण्याच्या सूचना होत्या. यानुसार पुणे जिल्ह्यात साधारण अडीच लाख अंगणवाडी सेविका, बचतगटाच्या सदस्या, आशा वर्कर यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाईल असे जाहीर करण्यात आले होते.
योजनेची अंमलबजावणी सुरू होऊन लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. काही महिन्यांचे पैसे जमा झाले. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही लवकरच जमा केला जाणार आहे. दुसरीकडे ज्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले त्यांनी अजूनही प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. हा निधी लवकरात लवकर जमा करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला होता. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे.
राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील सुमारे चार हजार अंगणवाडी सेविकांना एक कोटी 92 लाख रुपयांचा निधी दिला आहे. हा भत्ता येत्या काही दिवसांत अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. पुणे जिल्ह्यातील सेविकांसह पर्यवेक्षिकांनी 3 लाख 84 हजार 512 अर्ज भरले आहेत. त्यासाठी 1 कोटी 92 लाख 25 हजार 600 रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे. हा निधी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आता पुढील टप्प्यात हा निधी कोषागारात पाठवून त्याद्वारे रक्कम उपलब्ध झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मोठी बातमी! एप्रिल महिन्यात राज्यात आर्थिक गणना? अंगणवाडी अन् आरोग्य सेवक करणार सर्व्हे