दरवेळी संसदेच्या पायऱ्या चढताना जाणीव ठेव; दिल्ली गाजवण्यापूर्वी सुळेंनी सांगितला पवारांचा कानमंत्र

  • Written By: Published:
दरवेळी संसदेच्या पायऱ्या चढताना जाणीव ठेव; दिल्ली गाजवण्यापूर्वी सुळेंनी सांगितला पवारांचा कानमंत्र

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आज (दि.24) नरेंद्र मोदींसह 280 खासदारांनी शपथ घेतली. तर, उद्या (दि.25) राज्यनिहाय खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या बारामतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यादेखील शपथ घेणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सुळे यांनी एक्सवर एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी संसदेची पायरी चढण्यापूर्वी पवारांनी दिलेल्या कानमंत्राबाबत भाष्य केले आहे.

सुप्रिया सुळेंची एक्स पोस्ट काय?

सुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सर्वात पहिले बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने सलग चौथ्या वेळी निवडून देऊन मला लोकसभेत आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. हि माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब असल्याचे म्हटले आहे. लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असणाऱ्या संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे नवनिर्वाचित अठराव्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन असून, मी कृतज्ञतापूर्वक हे नमूद करते की, माझ्यावर मतदारांनी जो विश्वास टाकला तो सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे.

2009 मध्ये पवारांनी दिलेली शिकवण आजही लक्षात

पुढे पोस्टमध्ये सुळे यांनी लिहिले आहे की, मला आजही लक्षात आहे की, जेंव्हा मी २००९ साली पंधराव्या लोकसभेत पहिल्यांदा खासदार म्हणून पाऊल ठेवले तेंव्हा आदरणीय पवार साहेब यांनी मला एक शिकवण दिली. ते म्हणाले होते की, “सुप्रिया, तु खासदार म्हणून चालली आहेस. गेट नंबर एक ने आत जाऊन लोकसभेच्या पायऱ्या चढणार आहेस. एक कायम लक्षात ठेव की, बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेमुळे तुला ही संधी मिळाली आहे. दरवेळी पायऱ्या चढताना याची जाणिव ठेव.” मी जेंव्हा जेंव्हा संसदेत प्रवेश करते तेंव्हा तेंव्हा साहेबांची हि वाक्ये मला आठवतात असे सुळेंनी म्हटले आहे.

या निवडणुकीच्या प्रक्रियेत माझा लोकांच्यावरील असलेला विश्वास अधिक दृढ झाला. आपण योग्य मार्गावर असाल तर लोक तुम्हाला आयुष्यभर साथ-सोबत करतात याचाही प्रत्यय आला. हि खासदारकी जनतेच्या कामासाठी आहे, पुढील पाच वर्षांतील प्रत्येक क्षण हा केवळ जनतेसाठी आणि जनहिताच्या कामासाठी गेला पाहिजे याकडे माझा कटाक्ष असणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आम्हा सर्वांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा आदर्श घालून दिला आहे. हे सुत्र कायम डोळ्यांसमोर ठेवून चालण्याचा मी सदैव प्रयत्न करीत असते. सलग चौथ्या वेळी संसदेत प्रवेश करीत असताना मला वाढत्या जबाबदारीची जाणिव आहे.

माझ्या मतदारसंघातील प्रत्येक माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याचा माझा कायम प्रयत्न राहिल. लोकहिताचे मुद्दे संसदीय चौकटीत राहून मात्र अत्यंत आग्रही पणे सभागृहात मांडून त्याची तड लावण्यासाठी मी सदैव कार्यरत असेन. लोकांनी माझ्यावर वेळोवेळी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी यापुर्वी देखील मी अविरतपणे काम केले आहे. हा वसा यापुढील काळात देखील कायम राहिल, हे वचन यानिमित्ताने देते.

या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मी ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हावर महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.या निवडणूकीत प्रचारासाठी अक्षरशः जीवाचे रान करणारे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, विविध राजकीय संघटना यांसह सर्व सहकारी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतमंडळी, प्रिंट-टिव्ही-इलेक्ट्रॉनिक माध्यमे सर्वच हितचिंतक सर्वांचे मनापासून आभार. यापुढील काळातही आपले सहकार्य असेच मिळत राहील ही अपेक्षा. धन्यवाद.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज