तौरल इंडिया अन् त्रिवेणी इंजिनिअरिंगकडून समुद्री स्वावलंबनाला बळ, पूर्णतः स्वदेशी प्रोपल्शन गिअरबॉक्सची निर्मिती

Taural India : भारताच्या उत्पादन स्वावलंबनाकडे एक मोठी झेप! देशातील अग्रगण्य इंटिग्रेटेड अ‍ॅल्युमिनियम फाउंड्री तौरल इंडियाने, विविध औद्योगिक

  • Written By: Published:
Taural India

Taural India : भारताच्या उत्पादन स्वावलंबनाकडे एक मोठी झेप! देशातील अग्रगण्य इंटिग्रेटेड अ‍ॅल्युमिनियम फाउंड्री तौरल इंडियाने, विविध औद्योगिक व्यवसायात कार्यरत असलेल्या त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड (TEIL), म्हैसूरला उच्च-गुणवत्तेची अॅल्युमिनियम कास्टिंग्ज पुरविली आहेत. TEIL आणि तौरल इंडिया यांनी डिझाइन केलेल्या या कास्टिंग्जचा वापर TEIL ने भारताच्या ‘पॅट्रोल व्हेसल’ उपक्रमासाठी प्रोपल्शन गिअरबॉक्स तयार करण्यासाठी केला.

हा प्रकल्प यशस्वी झाल्यामुळे समुद्री प्रोपल्शन यंत्रणेच्या स्थानिकीकरणात (Taural India) एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. भारताच्या प्रगत समुद्री उत्पादन व्यवस्थेत या दोन्ही कंपन्यांची भूमिका अधिक बळकट झाली आहे. या सहकार्यात, तौरल इंडियाने केवळ पाच महिन्यांच्या कालावधीत 16 संपूर्ण कास्टिंग्ज निर्माण करून पुरविली आहेत.

अ‍ॅल्युमिनियम सँड-कास्टिंगमधील (Triveni Engineering) आपल्या उच्च कौशल्याचा प्रभावी वापर करून कंपनीने कॉम्पोनंट्सच्या वजनात आणि कास्टिंग डिझाइनमध्ये सुधारणा केली. संरचनात्मकदृष्ट्या मजबूत व अचूक कास्टिंग्ज तयार केली. हे सर्व कॉम्पोनंट्स या महत्त्वपूर्ण समुद्री अनुप्रयोगासाठी आवश्यक असलेल्या उच्च कार्यगुणवत्तेच्या मापदंडांना पूर्णपणे अनुरूप आहेत.

या सहकार्याबद्दल बोलताना, तौरल इंडियाचे मुख्य संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते म्हणाले, “हा तौरल इंडियासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. भारताच्या समुद्री क्षेत्रासाठी अचूक यंत्रणेवर आधारित, पूर्णतः स्वदेशी उपाय पुरविण्याची आमची क्षमता यामुळे सिद्ध झाली आहे. तांत्रिक विकासाच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्रिवेणी इंजिनिअरिंगचे मनःपूर्वक आभार मानतो. स्थानिक अभियांत्रिकीद्वारे जागतिक दर्जाची अचूकता साध्य करण्यावर आमचा नेहमीच भर राहिला आहे, आणि या प्रकल्पाने भारताच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निर्मितीक्षमतेला अधोरेखित केले आहे.”

त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पॉवर ट्रान्समिशन व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव राजपाल यांनी सांगितले, “हलके वजनाचे प्रोपल्शन गिअरबॉक्सचे यशस्वी स्थानिकीकरण हे भारताच्या समुद्री स्वावलंबनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उच्च-प्रिसीजन अ‍ॅल्युमिनियम सँड-कास्टिंगमधील कौशल्य आणि जटिल रचनेचे मोठे कॉम्पोनंट्स उच्च मरीन मानकांनुसार वेळेत तयार करण्याची क्षमता या दोन्ही गोष्टींसाठी आम्ही तौरल इंडियाची निवड केली. त्यांची तांत्रिक क्षमता आणि वेळेत काम पूर्ण करण्याची बांधिलकी या प्रकल्पाच्या यशात निर्णायक ठरली. आम्हाला अभिमान आहे की हा संपूर्ण उपाय ‘डिझाइन टू डिलिव्हरी’ पूर्णतः भारतात विकसित झाला आहे.”

तौरल इंडिया ही अमेरिकन ब्युरो ऑफ शिपिंग (ABS) मान्यताप्राप्त कंपनी असून, जागतिक मानकांनुसार समुद्री क्षेत्रासाठी भरवशाचा आणि विश्वसनीय सप्लायर म्हणून तौरल इंडियाची भूमिका सिद्ध होते. या प्रकल्पाद्वारे TEIL नेही भारताच्या समुद्री उत्पादन व्यवस्थेत आपली सक्षम आणि महत्त्वपूर्ण भूमिका अधिक दृढ केली आहे. या दोन भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने साधलेले यश देशातील उत्पादन क्षेत्रातील तांत्रिक उन्नतता आणि स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची ताकद दर्शवते ज्यामुळे जागतिक दर्जाचे उपाय भारतात विकसित होत आहेत.

follow us