पुण्यात राजकीय भूंकप? गोऱ्हेंच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या ठाकरेंच्या ‘वाघिणी’ शिंदेंच्या संपर्कात

Thackeray Group Womens protesting Against Neelam Gorhe : राज्यभरात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ठाकरेंविरोधात मिशन टायगर राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षाला मोठी गळती सुद्धा लागली आहे. पुण्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या महिला एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलीय.
मातोश्रीवर काल महिला आघाडीची बैठकी पार पडली. या बैठकीत देखील मोठा गोंधळ झाल्याचं समोर आलंय. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातच आंदोलन केलेल्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मातोश्रीवर काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर पुणे आणि मुंबई महिला आघाडीमध्ये वाद झाला होता. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या घराबाहेर पुण्यातील महिला आघाडीने आंदोलन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते. मात्र, यानंतर मुंबईतील वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांना सुनावलं.
दिल्लीत विधानसभेत गदारोळ, आम आदमी पार्टीचे सर्व आमदार निलंबित; काय घडलं?
कोणाला विचारून तुम्ही आंदोलन केलं, पद तर सोडाच पण कुठल्या कोपऱ्यात फेकू हे देखील कळणार नाही अशी थेट धमकीच या महिला पदाधिकाऱ्यांना मिळालीय. ठाकरे गटाच्या एका महिला उपनेत्याने पुण्यातील महिला कार्यकर्त्यांना थेट धमकी (Maharashtra Politics) दिलीय. त्यामुळे नाराज झालेल्या ठाकरे गटातील 15 महिला पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समोर येतंय. पुण्यातील त्या 15 महिला पदाधिकारी उदय सामंत यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय.
मातोश्रीवर घडलेला प्रकार पुण्यातील महिलांनी संजय राऊत आणि विनायक राऊत यांनाही सांगितला. संजय राऊत यांनी 2 दिवस शांत राहा आपण मार्ग काढू असं म्हणत संभाव्य बंड थोपवण्याचा प्रयत्न केला आहे.
पक्षातील फूट थोरात रोखणार का? संगमनेरात आज कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद..
नेमकं काय घडलं बैठकीत?
पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी केलेलं आक्रमक आंदोलन पाहून शिवसेना पमुख उद्धव ठाकरे यांनी महिला आघाडीचे कौतुक केलं. इतकंच नाही तर या सर्व महिलांना मातोश्रीवर बोलावून त्यांच्याशी संवादही साधला. यातील काही महिलांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधताना आम्ही आंदोलन करतो, भाजप शिवसेनेच्या नेत्यांना अंगावर घेतो. मात्र पद देण्याची वेळ येते, तेव्हा आम्हाला दूर ठेवले जाते अशी खंत बोलून दाखवली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही आंदोलन छान झाले, मात्र आंदोलन करताना स्वतःची काळजी घ्या. शिवसेनेशी एकनिष्ठ राहणाऱ्या महिलांचा भविष्यात नक्की विचार केला जाईल, असं आश्वासन या महिलांना दिलंय. मात्र, उद्धव ठाकरे जाताच या महिलांच्या वाट्याला अपमान आला.
त्यानंतर उद्धव ठाकरे या महिलांना भेटून गेल्यानंतर मातोश्रीवरच वादाची ठिणगी पडली. उद्धव ठाकरे यांच्या समोरच शिवसेनेतील पद वाटपाचा मुद्दा काढल्यामुळे एक महिला शिवसेना उपनेत्या चांगल्याच संतप्त झाल्या. कारण महिला आघाडीतील पद वाटपाची जबाबदारी त्या उपनेत्याकडेचं आहे. त्यामुळे त्यांनी पुण्यातून आलेल्या या महिलांचा अपमान केला. इतकंच नाही तर तुम्हाला पद कसे मिळते तेच बघते. कुठल्या कोपऱ्यात पडून राहाल ते कळणारही नाही, अशा शब्दात या महिलांचा अपमान केला.
या सर्व घडामोडीनंतर पुण्यातून मातोश्रीवर गेलेल्या या महिलांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कौतुक केले, पाठीवर शाबासकीची थापही दिली. मात्र उद्धव ठाकरे निघून जाताच या महिलांच्या वाट्याला अवहेलना आली. त्यामुळे संतप्त झालेल्या या महिला बाहेर पडल्या. आता शिवसेनेतील या महिलांनी शिंदे गटात जाण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती आहे.