पुणे स्थानिक स्वराज्यचा कुणाचा आमदार होणार ? राष्ट्रवादी अन भाजपमध्ये जोरदार टक्कर !
Vidhan Parishad Election-तर २०१० आणि २०१६ च्या सलग दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भोसले यांनी बाजी मारली. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांची मुदत संपली.
Vidhan Parishad Election : गेल्या सुमारे चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीत अडकलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांपूर्वी पार पडल्या. या निवडणुका रेंगाळल्यामुळे पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूकही (
Vidhan Parishad Election) अनेक महिन्यांपासून रखडली होती. आता या निवडणुकीची घोषणा झाली असून, असून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यात १६ जागांसाठी निवडणूक होणार असून १८ जून रोजी मतदान होणार आहे.
ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पुण्याच्या राजकीय वर्तुळात, विशेषतः सत्ताधारी महायुतीमध्ये या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली होती. राष्ट्रवादीच्या या पारंपरिक बालेकिल्ल्यावर सध्या स्थानिक पातळीवर आपले संख्याबळ अधिक असल्याने भाजपने या जागेवर आपला दावा ठोकण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या जागेसाठी दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा इतिहास पाहिला, तर या जागेवर नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. १९९८ ते २००४ या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र रणपिसे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर २००४ मध्ये पिंपरी-चिंचवडचे दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढवून ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर २०१० आणि २०१६ च्या सलग दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भोसले यांनी बाजी मारली. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांची मुदत संपली आणि तेव्हापासून लोकप्रतिनिधींअभावी ही जागा रिक्त होती.
आता पुण्याचे संपूर्ण राजकीय समीकरण बदलले आहे. भूतकाळात हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड राहिला असला, तरी सध्याच्या घडीला भाजपने जिल्ह्यात आपले पाय घट्ट रोवले आहेत. त्यामुळे आगामी जागावाटपात ही जागा नेमकी कोणाच्या खिशात जाणार, यावर बरंच काही अवलंबून असेल. महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच या जागेसाठी अंतर्गत स्पर्धा रंगली असून, त्या तुलनेत महाविकास आघाडीचे इथले संख्याबळ सध्या कमालीचे घटलेले दिसत आहे. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षांमध्येच लढाई रंगण्याची दाट शक्यता आहे.
कोणाकडे किती मतदार ?
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या या निवडणुकीत एकूण ८२७ मतदार म्हणजेच लोकप्रतिनिधी सदस्य आपला हक्क बजावणार आहेत. सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणामध्ये महायुतीचे पारडे प्रचंड जड दिसत आहे. एकूण ८२७ सदस्यांपैकी महायुतीकडे तब्बल ७३४ सदस्यांचे बळ आहे. यामध्ये सर्वाधिक ३४७ सदस्य अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत, तर भाजप ३१९ सदस्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे इथे ६८ सदस्य आहेत. त्या तुलनेत महाविकास आघाडीकडे अवघे ४७ सदस्य असून यामध्ये काँग्रेसचे १९, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे १७ आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ११ सदस्य आहेत. याशिवाय २३ अपक्ष आणि २३ स्थानिक आघाड्यांचे सदस्य निर्णायक भूमिकेत आहेत. जर पुणे जिल्ह्यातील संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांचा सविस्तर आढावा घेतला, तर सर्वच ठिकाणी महायुतीने आपले वर्चस्व निर्माण केल्याचे स्पष्ट होते.
स्थानिक आघाड्यांना असणार महत्त्व ?
यामध्ये जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील पक्षीय बलाबल पाहिले तर तिथे एकूण ३९४ जागा आहेत. बारामती, इंदापूर, जुन्नर, लोणावळा, तळेगाव, वडगाव मावळ, चाकण, राजगुरूनगर, मंचर, देहू, आळंदी, दौंड, खेड, हवेली, जेजुरी, भोर, सासवड आणि शिरूर या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने २१९ सदस्यांसह आपले वर्चस्व राखले आहे. तर भाजपचे ९०, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ५५, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ११, काँग्रेसचे ४ आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ४ सदस्य आहेत. उर्वरित जागांवर स्थानिक आघाड्यांचे २४, अपक्ष २७ आणि बसप-रासपचे २ सदस्य आहेत.
जिल्ह्याची मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेत आणि पंचायत समित्यांमध्येही अजित पवार गटाचेच एकहाती वर्चस्व पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ७३ सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५१ सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष आहे, तर भाजपचे १०, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ६, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ५ आणि शरद पवार गटाचा केवळ १ सदस्य आहे. या निवडणुकीत पंचायत समितीच्या सभापतींनाही मतदानाचा अधिकार असतो. जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांपैकी तब्बल ११ ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती विराजमान आहेत, तर उर्वरित २ ठिकाणी भाजपचे सभापती आहेत. दरम्यान, या आकडेवारीत जिल्हा परिषदेतील स्वीकृत सदस्यांची अद्याप निवड न झाल्याने त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.
पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमुळे भाजप जड…
दुसरीकडे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही प्रमुख महानगरपालिकांमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व राखले आहे. पुणे महानगरपालिकेत एकूण १६८ सदस्यांपैकी भाजपकडे ११९ सदस्यांचे प्रचंड बहुमत आहे. तर अजित पवार गटाचे २३, काँग्रेसचे १२, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ७, उद्धव ठाकरे गटाचे ५ आणि शरद पवार गटाचे २ सदस्य आहेत. पालिकेतील १० स्वीकृत सदस्यांमध्येही भाजपचे ७, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचा १ सदस्य आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा विचार केल्यास, तिथल्या एकूण १२८ सदस्यांपैकी भाजपकडे ८४ तर अजित पवार गटाकडे ३६ सदस्य आहेत. शरद पवार गटाचे २, एकनाथ शिंदे गटाचे ३ आणि उद्धव ठाकरे गटाचा १ सदस्य तिथे आहे. येथील १० स्वीकृत सदस्यांमध्ये भाजपचे ७ तर अजित पवार गटाचे ३ सदस्य आहेत.
एकंदरीत, आकड्यांच्या या संपूर्ण गणितात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जिल्ह्यातील नगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक संख्याबळ आहे, तर भाजपने दोन्ही महापालिकांमध्ये आपली ताकद सिद्ध केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात महायुतीचे ७३४ सदस्य असल्याने विरोधकांचे आव्हान सध्यातरी निकालातून बाद झाल्यासारखे चित्र आहे. मात्र, आपल्या या पारंपरिक हक्काच्या जागेवर दावा सांगणारा अजित पवार गट आणि दोन्ही महापालिकांमधील संख्याबळाच्या जोरावर पुण्यात आपले वर्चस्व अधिक वाढवू पाहणारा भाजप, या दोघांपैकी वरिष्ठ पातळीवर नेमके कोणाचे पारडे जड ठरते आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, हे पाहणे आता कमालीचे उत्सुकतेचे ठरणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असल्याने राष्ट्रवादी भाजपचे आव्हान कसे पेलणार आणि त्यातही भाजपच्या इच्छुकांमध्ये बलाढ्य नेते असल्याने राष्ट्रवादी ही जागा आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होणार का ? की सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात त्या आपल्या राजकीय नेतृत्वाची चुणूक दाखवणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.