टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूवर FIR, काय आहे नेमकं प्रकरण
T20 World Cup 2007 : 2007 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2007) ऐतिहासिक षटक टाकणारा माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) अडचणीत आला आहे. त्याच्यावर हरियाणाच्या हिस्सारमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगिंदरने 2007 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शेवटचे षटक टाकले होते. त्यामध्ये मिसबाह-उल-हकला (Misbah-ul-Haq) बाद करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. जोगिंदर शर्मा हा हरियाणातील कालका येथे डीएसपी पदावर कार्यरत आहे.
हिस्सारमधील आझाद नगर पोलिस ठाण्यात जोगिंदर शर्मासह सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हिस्सारमधील पाबडा गावातील पवन नावाच्या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी जोगिंदरने आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.
एएसपी राजेश कुमार मोहन यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, एससी-एसटी कलमच्या आधारे तपासानंतर कारवाई केली जाईल. हिस्सारच्या आझाद नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी संदीप कुमार यांनी पवनच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
पाबडा गावातील सुनीता हिने 2 जानेवारी रोजी आझाद नगर पोलीस ठाण्यात सांगितले की अजयवीर, ईश्वर प्रेम, राजेंद्र सिहाग व इतरांवर घराच्या प्रकरणात खटला सुरू आहे. या प्रकरणामुळे तिचा मुलगा पवन अस्वस्थ झाला होता. यातून मुलाने 1 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्यानंतर कुटुंबीयांच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृताच्या आईने माजी क्रिकेटपटू जोगिंदर, अजयवीर, ईश्वर प्रेम, राजेंद्र आणि इतरांवर आपल्या मुलावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. कुटुंबातील सदस्यांनी एससी-एसटी कलम जोडण्यासह सहा मागण्या एएसपीसमोर ठेवल्या होत्या. यासाठी त्यांनी आंदोलन देखील केले होते. एएसपी डॉ.राजेश मोहन यांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन कुटुंबियांना दिले आहे.
पवारांचा पॉवर गेम! CM शिंदेंना धक्का देत बाळ्या मामा म्हात्रेंची राष्ट्रवादीत एन्ट्री
दरम्यान, या प्रकरणावर तत्कालीन डीएसपी जोगिंदर शर्मा म्हणाले की, या बाबतीत कोणतीही माहिती नाही. मी पवनला ओळखत नाही किंवा भेटलो नाही. माझ्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात मी खूप तपास केला आणि असे एकही प्रकरण माझ्या निदर्शनास आले नाही.
पत्नी राजकारणात अन् पती कुख्यात गुन्हेगार; शरद मोहोळ गॅंगचा विषय काय?
कोण आहेत जोगिंदर शर्मा?
2007 च्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जोगिंदरने शेवटच्या षटकात मिसबाह-उल-हकला बाद केले होते आणि भारत विश्वविजेता झाला होता. यानंतर तो हरियाणा पोलिसात डीएसपी झाला होता. सध्या कालका येथे तैनात आहे. त्याने भारतासाठी 4 एकदिवसीय आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे त्याने आपल्या कारकिर्दीतील T20 आंतरराष्ट्रीय सामने केवळ 2007 च्या विश्वचषकात खेळले होते पण इतिहास रचला. जोगिंदरने 2004 मध्ये भारतासाठी वनडेत पदार्पण केले होते आणि 2007 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. 40 वर्षीय जोगिंदरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच विकेट आहेत.