महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या ‘MOA’ निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या पॅनेलची घोषणा
बहुमत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा विजय निश्चित आहे. यापूर्वीच उपाध्यक्ष पदांची बिनविरोध निवड झाली आहे.
 
          मुंबई दि. ३० ऑक्टोबर – महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ऑलिम्पिक पॅनेलचे पारडे जड असल्याचं स्पष्ट झालं आहे. येत्या रविवारी होणाऱ्या एमओएच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे २१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यापैकी ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.  ३० मतदार संघटनांपैकी २२ पेक्षा अधिक संघटनांनी अजित पवार यांना आपला पाठिंबा जाहिर केला आहे.
बहुमत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा विजय निश्चित आहे. यापूर्वीच उपाध्यक्ष पदासाठी आदिल सुमारीवाला, प्रदिप गंधे व प्रशांत देशपांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विजयी उमेदवार आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रदिप गंधे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. याचे श्रेय क्रीडा क्षेत्राला सर्वतोपरी मदत करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,क्रीडामंत्री, क्रीडा प्रशासन यांना देखील आहे. पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने राज्यातील सर्व क्रीडा संघटनांना सोबत घेऊन काम केले आहे.
राज्यातील खेळाडूंनी प्रचंड मेहनत घेऊन मागील तीन वर्षांमध्ये तीनही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. हे यश राज्यातील सर्व क्रीडा संघटना आणि खेळाडूंच्या प्रयत्नांचेच आहे. अजित पवार यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे एमओएच्या संकल्पनेतून राज्यात महाराष्ट्र ऑलिम्पिक भवनासह देशातील पहिले क्रीडा संग्रहालय साकार होत आहे. यामुळेच निवडणुकीत बहुसंख्य संघटनांनी अजित पवार गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. खेळामध्ये कुठलेही राजकारण न आणता क्रीडा क्षेत्रासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याचा अजित पवार गटाचा मानस आहे.
अजित पवार काय म्हणाले?
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतील २२ पेक्षा अधिक संघटनांनी पुण्यातील बैठकीत उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना जाहिर पाठिंबा दिला आहे. ही कुठलीही राजकीय निवडणूक नाही. त्यामुळे मी स्वतःही कोणतेही राजकीय विधान केलेले नाही.कोणी राजकीय रंग देत असतील तर ती महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली पाहिजे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
अध्यक्ष – अजित पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष – अशोक पंडित, उपाध्यक्ष – आदिल सुमारीवाला- (बिनविरोध निवड), उपाध्यक्ष- प्रदिप गंधे, (बिनविरोध निवड) उपाध्यक्ष – प्रशांत देशपांडे, (बिनविरोध निवड), उपाध्यक्ष – दयानंद कुमार , (बिनशर्त पाठिंबा) सचिव – नामदेव शिरगांवकर, सहसचिव – निलेश जगताप, उदय डोंगरे, मनोज भोरे, चंद्रजीत जाधव, खजिनदार – स्मिता शिरोळे, कार्यकारिणी सदस्य – संदिप चौधरी,संदिप ओंबासे,राजेंद्र निम्बाते, गिरीश फडणीस,रणधीरसिंग,किरण चौगुले,समीर मुणगेकर,संजय वळवी, सोपान कटके आदी.


 
                            





 
		


 
                         
                        