Asian Fencing Championships : भवानी देवीने चीनमध्ये रचला इतिहास; तलवारबाजीत जिंकले पदक

Asian Fencing Championships : भवानी देवीने चीनमध्ये रचला इतिहास; तलवारबाजीत जिंकले पदक

Asian Fencing Championships :  भारतीय तलवारबाज भवानीदेवीने सोमवारी इतिहास रचला आहे. भवानी देवीने चीनमधील वूशी येथे झालेल्या आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपच्या महिला सेबर स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यात भवानी देवीला पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र असे असतानाही भवानी देवीने इतिहास रचला आहे. अशा प्रकारे पदक पटकवणारी भवानी देवी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

चीनमधील वूशी येथे सुरू असलेल्या आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये महिला सेबर स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भवानीला उझबेकिस्तानच्या झेनाब डेबेकोवाने पराभूत केले. या सामन्यात झैनाब देबेकोवाने भवानीचा 14-15 असा पराभव केला, पण तरीही भवानी देवीने या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक निश्चित केले.

तत्पूर्वी, भवानी देवीने उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या जपानच्या मिसाकी इमुरा हिला १५-१० असे पराभूत करून मोठा विजय मिळवला होता. वास्तविक, मिसाकीविरुद्ध भवानीचा हा पहिला विजय होता. यापूर्वी प्रत्येक वेळी जपानच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंचा पराभव केला होता.

त्याचबरोबर भारतीय तलवारबाजी संघटनेचे महासचिव राजीव मेहता यांनी आशियाई तलवारबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल भवानी देवीचे अभिनंदन केले आहे. भारतीय तलवारबाजीसाठी हा अतिशय अभिमानाचा दिवस असल्याचे ते म्हणाले. याआधी कोणीही जे साध्य करू शकले नाही ते भवानीने केले आहे. प्रतिष्ठित आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय तलवारबाजी आहे. संपूर्ण तलवारबाजी जगाच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो, असे मेहता म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube