शाब्बास टीम इंडिया! पहिल्याच सामन्यात UAE ला चारली धूळ; फक्त 27 चेंडूतच सामना जिंकला
या सामन्यात भारताला अगदीच कमी टार्गेट मिळाले होते. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी हे टार्गेट सहज पार केले.

India Beat UAE in Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेतील ग्रुप ए मधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने यूएईचा दणदणीत पराभव केला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. या सामन्यात भारताला अगदीच कमी टार्गेट मिळाले होते. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी हे टार्गेट सहज पार केले. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजीतील सुरुवात चांगली राहिली. गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला त्यामुळे यूएईच्या फलंदाजांवर दडपण आले. त्यांना रन करण्याची फारशी संधी मिळाली नाही.
जसप्रित बुमराहने पहिली विकेट घेतली (IND vs UAE) यानंतर मात्र यूएईचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. एकामागोमाग एक विकेट (Asia Cup 2025) पडत गेल्या. एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आले नाही. यूएईकडून अलीशान शराफूने सर्वाधिक 22 धावा केल्या तर कर्णधार वसीमने 19 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही.
Asia Cup : विजेत्या संघावर होणार पैशांचा वर्षाव; बक्षिसाच्या रकमेत एक कोटींची वाढ
भारताच्या सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. कुलदीप यादव आणि शिवम दुबे यांनी गोलंदाजीत (India vs UAE) कमाल केली. कुलदीपने 2.1 ओव्हर्समध्ये फक्त 7 रन दिले आणि 4 विकेट घेतल्या. तर शिवम दुबेने 2 ओव्हरमध्ये 4 धावा देत 3 विकेट घेतल्या. जसप्रित बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती एक-एक विकेट घेण्यात यशस्वी ठरले.
फक्त 27 चेंडूत जिंकला सामना
टीम इंडियाला फक्त 52 धावांचे टार्गेट मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल मैदानात उतरले. शुभमन गिलने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. अभिषेकनेही फक्त 15 चेंडूत 30 धावा केल्या. यात दोन चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. शुभमन गिलने 8 चेंडूत 16 धावा केल्या कर्णधार सूर्यकुमार यादवने एक चेंडूत सहा धावा केल्या. भारताने हा सामना फक्त 4.3 ओव्हरमध्येच जिंकला.
आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामना होणार का? बीसीसीआय सचिवांचं फायनल उत्तर