बंडोबा रडारवर ! तब्बल १६ बंडखोर उमेदवारांची काँग्रेसमधून हकालपट्टी
Maharashtra Assembly Elections 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्वच (Maharashtra Elections) पक्षांत बंडखोरी आणि नाराजी उफाळून आली आहे. तिकीट मिळालं नाही म्हणून एकतर अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षांच्या तिकीटावर निवडणूक लढणारे अनेक उमेदवार रिंगणार उतरले आहेत. काँग्रेसही याला (Congress Party) अपवाद नाही. बंडखोरीची लागण काँग्रेसला मोठ्या प्रमाणात झाली आहे. या बंडखोरीची दखल पक्षनेतृत्वाने घेतली असून या उमेदवारांचा कारवाईचा बडगा उगारला आहे. बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढणाऱ्या १६ उमेदवारांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या सूचनेवरून पक्षाने या बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
मोठी बातमी : काँग्रेसचा बंडखोरांना दणका! पाच नेते सहा वर्षांसाठी निलंबित
दरम्यान, याआधी सहा उमेदवारांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. यामध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघात राजेंद्र मूळक, काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकार,पर्वती विधानसभा मतदारसंघात आबा बागूल तर कसबा मतदारसंघातील कमल व्यवहारे, सांगली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी करणाऱ्या जयश्री पाटील यांना पक्षाने निलंबित केलं होतं.
त्यानंतर आता आणखी काही बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये आरमोरीमध्ये आनंदराव गेडाम, शिलू चिमूरकर, गडचिरोलीतील सोनल कोवे, भरत येरमे, बल्लारपूरमधील अभिलाषा गावतूरे, राजू झोडे, भंडाऱ्यातील प्रेमसागर गणवीर, अर्जुनी मोरगावमधील अजर लांजेवार, भिवंडीतील विलास रघुनाथ पाटील, आसमा चिखलेकर, मिरा भाईंदरमधील हंसकुमार पांडे, पलूस कडेगावमधील मोहनराव दांडेकर आदींचा समावेश आहे.
आमच्याकडे घोषणापत्र तर काँग्रेसकडे घोटाळापत्र, मोदींचा नाशिकमधून विरोधकांवर हल्लाबोल
राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी बंडखोर उमेदवारांची भेट घेत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कारवाईचा इशाराही दिला. याचा परिणाम काही ठिकाणी दिसला. बऱ्याच जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण काही मतदारसंघातील बंडखोरांनी पक्षाच्या आदेशालाही जुमानलं नाही. अर्ज माघारी घेतले नाहीत. आता अशा बंडखोरांवर पक्षाने कारवाईस सुरुवात केली आहे. निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलल्याने काँग्रेसने सहा सदस्यांवर कडक कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसच्या या कारवाईची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.