Prabha Atre Death: ‘संगीतविश्वातला तारा निखळला; CM शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

Prabha Atre Death: ‘संगीतविश्वातला तारा निखळला; CM शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

CM Eknath Shinde On Prabha Atre: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे (Prabha Atre Passes Away) यांंचं ९२ व्या वर्षी निधन झालं. प्रभा (Prabha Atre) यांनी त्यांच्या गायनाने गेली अनेक दशकं रसिकांचं मनोरंजन केलं. भारतीय संगीत क्षेत्राला मिळालेलं सृजनशील, अलौकीक प्रतिभा यांचं अनोखं वरदान म्हणता येईल, अशी एक तेजस्वी गान प्रभा आज निमाली आहे, अशा शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


भारतीय संगीत क्षेत्राचं क्षितीज उजळवून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वात ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा समावेश करावा लागेल. शास्त्रीय संगीतातील त्यांचं योगदान उच्चकोटीचे राहीले आहे. संगीतातील विविध प्रवाहांना सामावून घेऊन, हे क्षेत्र त्यांनी समृद्ध केलं. आपल्या अलौकिक प्रतिभेनं त्यांनी गायनातील मानदंड प्रस्थापित केले. त्यांचं गाण स्वर्गीय आणि मंत्रमुग्ध करणारं होतच. पण आपल्या संगीत क्षेत्राचं देखणेपण आणि नजाकत प्रकट करणारं होते. त्यांनी भारतीय संगीताचं हे रुप आपल्या प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्त्वातून देश-विदेशातही पोहचवलं.

आपल्या प्रसन्न, वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरांनी त्या अजरामरच आहेत. आवाजाच्या रुपात त्या आपल्या अवतीभवतीच राहतील. पण संगीत क्षेत्राला मात्र त्यांची निश्चितच पोकळी जाणवेल. ही भारतीय संगीत क्षेत्राची आणि रसिकांसाठी मोठी हानी आहे. भारतीय संगीतामध्ये होणारे विविध बदल सहजपणे आत्मसात करीत संगीत क्षितिजावर अढळ स्थान निर्माण करणाऱ्या स्वरयोगिनीच्या रुपातील एक तेजस्वी तारा निखळला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान डॉ. अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Prabha Atre Passes Away: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभाताई अत्रे यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारे आहे. किराणा घराण्याच्या गायिका प्रभाताई अत्रे यांनी शास्त्रीय गायनातून देशभरातील रसिक नुसता मंत्रमुग्ध केला नाही, तर तो अधिक समृद्ध केला. ठराविक पठडीच्या बाहेर जाऊन गायनासाठी त्या ओळखल्या जात. नाविन्य हे त्यांच्या गायनशैलीचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या स्वरांना तप:श्चर्येचे बळ होते. केवळ गायन नाही तर आपले रसिक जाणकार असावेत, यासाठी त्यांनी लेखन सुद्धा केले. त्यांच्या संगीत सेवेसाठी त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ अशा तिन्ही पुरस्कारांनी गौरवान्वित केले.

गेल्याच महिन्यात 25 डिसेंबर 2023 ला पुण्यात त्यांना अटल संस्कृति पुरस्कार प्रदान केला, तेव्हा तीच शेवटची भेट ठरेल, अशी कल्पनाही नव्हती. त्यांना भेटणं, त्यांचं गाणं ऐकणं ही कायम विलक्षण अनुभूती असायची. भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी दिलेले योगदान शब्दात मांडणे अशक्य आहे. प्रभाताईंनी भारतीय शास्त्रीय संगीताची सेवा करताना नव्या गायक-गायिकांना घडविण्याचे कार्य केले. भारतीय संगीत त्यांचे कायम ऋणी राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि चाहत्यांना लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube