Nitin Desaiच्या’ आत्महत्येवर कौशल इनामदार यांची प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाले; “माझं नातं…”

Nitin Desaiच्या’ आत्महत्येवर कौशल इनामदार यांची प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाले; “माझं नातं…”

Kaushal Inamdar : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी स्वत:चे जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येताच सर्वांनाच धक्का बसला आहे. याबद्दल अनेक कलाकार, नेते, सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळी हळहळ व्यक्त करत आहेत. नितीन देसाई यांनी आत्तापर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपट, मालिकांचं कला दिग्दर्शन केलं आहे. या त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांचं अनेक कलाकारांशी खूप चांगलं नातं तयार झालं


‘सरण जळताना नभांगण, जळत गेले चंद्र तारे
जळत बघताना अजिंठा, बुद्धदेवाला शहारे’
‘अजिंठा’मध्ये रॉबर्ट गिल त्याच्या चित्रांचं प्रदर्शन विलायतेत आटपून पारूला भेटण्याच्या ओढीने परत भारतात येतो पण तोवर पारू हे जग सोडून गेली असते. तिच्या चितेचा अग्नी विझलाही नसतो, जेव्हा गिलची चित्र ज्या कला दालनात प्रदर्शित केली असतात त्या दालनाला आग लागते आणि ४ चित्र सोडून बाकीची सगळी जळून खाक होतात. एका क्षणात गिलची गेली १० वर्ष काळाच्या पटावरून नियती खोडून टाकते. जी गिलची मनोवस्था झाली असेल तीच माझी गेल्या दोन दिवसांपासून झाली आहे.

दर वर्षीप्रमाणे २ तारखेला या वेळीही चेतन दातारबद्दल मी पोस्ट टाकली. प्रत्येक २ ऑगस्टला मी जरा हळवा होतोच कारण चेतनच्या असण्यासारखंच त्याचं नसणंही माझ्या आयुष्यात खोलवर परिणाम करणारं ठरलंय. मी ती पोस्ट केली आणि खुर्चीतून उठता क्षणी माझा फोन वाजला. सिटी प्राइडचे मालक – चाफळकर काकांचा फोन. त्यांनी विचारलं – “नितीनची बातमी खरीए का? तू त्याच्या जवळचा म्हणून तुला फोन लावला आधी.” मला काहीच कळेना. “कसली बातमी?” मी विचारलं. त्यांनी उत्तर पूर्ण करेपर्यंत मला कॉल वेटिंगवर अनेक वेगवेगळ्या नंबरांवरून फोन येणं सुरू झालं होतं.
नितीनदादा, आत्महत्या, या शब्दांचा मला काही परस्पर संबंधच लावता आला नाही क्षणभर. काहीतरी चुकतंय. काहीतरी गडबड झाली आहे लोकांची हेच मनात येत राहिलं. डोक्यात अतीव कोलाहल झाल्यावर जी सुन्नतेमधून एक भयानक शांतता तयार होते तसा माझा संपूर्ण दिवस गेला.

दुसरा दिवस उजाडतो तोच महानोर दादांच्या निधनाची बातमी समजली आणि मग मात्र एक घोर निराशा मनाला व्यापून राहिली. महानोरांचं जाणं दुःखदायक होतं पण नितीन देसाईंचं जाणं हे चटका लावणारं होतं; सुन्न करणारं होतं. मला अचानक असं लक्षात आलं की माझ्याच ओळखीत असे लोक आले ज्यांनी काही न काही कारणास्तव आत्महत्या केली. कुणी तब्येतींच्या तक्रारीमुळे, कुणी आर्थिक विवंचनेमुळे, कुणी मानसिक कुचंबणेमुळे तर कुणी नैराश्याने ग्रासल्यामुळे. पूर्वी समाजमाध्यमं नव्हती तेव्हाही अशी काही घटना घडली की त्यावर चर्चा व्हायची पण आता मात्र या सगळ्या चर्चा, त्या घटनेभोवती फिरणारी योग्य-अयोग्य, इष्ट-अनिष्ट, उचित-अनुचित मतं नको तितकी ॲम्प्लिफाय होतात आणि शहाणीसुरती वाटणारी माणसंसुद्धा भडक, भपकेदार बोलू लागतात. पण मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. काळाचा महिमा असं म्हणून ते सोडून देणं आणि त्या वागण्याला प्रतिक्रिया न देऊन त्याला neutralise करणं हेच इष्ट. एक मात्र खरं की ओळखीच्या माणसाच्या आत्महत्येचा आपल्यावर फार खोलवर परिणाम होतो. निदान माझ्या मनावर तो झाला.

शीतल आमटेच्या दुर्दैवी निधनानंतर जे अनेक विचार माझ्या मनात घोंघावत होते ते मी लिहून काढायचा तेव्हा प्रयत्न केला पण तेव्हा ते इतकं emotionally taxing झालं की ते अर्धवटच राहिलं. नितीनदादांच्या मृत्यूने मात्र ते सगळे विचार पुन्हा एकदा मनात दाटी करू लागले. आज बसून मी ते लिहून काढले. ते फार व्यक्तिगत असले तरी मला असं वाटतं की मी तुमच्याबरोबर ते शेअर करावे. नैराश्याच्या गर्तेत असलेल्या माणसाला सल्ले नको असतात. त्याला/ तिला मनावर एक फुंकर हवी असते. आपले शब्द फुंकर असू शकतात का? म्हणून आज रात्री मी इथे आणि माझ्या यूट्यूब वाहिनीवरही हे विचार मांडणार आहे. अजिंठाच्या या दोन महत्त्वाच्या स्तंभांना श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्याला शांती आणि सद्गती लाभो हीच प्रार्थना. आता कौशल इनामदार यांची ही पोस्ट चर्चेत आली असून त्यावर कमेंट करत नेटकरी दुःख व्यक्त करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube