दु:खद! विद्यार्थीप्रिय दाम्पत्यावर काळाचा घाला; सेवानिवृत्त प्रा. रामराव माने अन् पत्नी रत्नमाला माने यांचा अपघाती मृत्यू
छत्रपती संभाजीनगर परिसरातील पडेगाव येथे एक दु:खद घटना घडली आहे. येथे प्रा. डॉ. राम माने आणि त्यांच्या पत्नी यांचा अपघात झाला.
छत्रपती संभाजीनगर येथून एक दु:खदायक बातमी समोर आली आहे. (Bamu) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थीप्रिय सेवनिवृत्त प्राध्यापक डॉ. रामराव आत्माराम माने, (73) आणि त्यांची पत्नी जिल्हा कोर्टातील वरिष्ठ वकील अॅड. रत्नमाला साळुंके-माने (65) यांचे अपघाती निधन झाले. ही घटना आज शनिवार, (दि. 25 ऑक्टोबर)रोजी सायंकाळी पडेगाव परिसरात 6 वाजेच्या सुमारास घडली.
माने दांपत्य येथील रस्ता ओलांडत असताना वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अकस्मात जाण्याने शैक्षणिक, न्याय व सामाजिक क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. डॉ. माने यांच्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना एक आदर, आपुलकी आणि प्रेम कायम पाहायला मिळायचा.त्यांच्या निधनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील अनेक विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.
ब्रेकिंग : साराभाई Vs साराभाई फेम अभिनेते सतीश शाह यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
डॉ. माने हे १९८० ते २०२४ या काळात रसायनशास्त्र विभागात कार्यरत होते. २००६ ते २०१० या काळात अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून कार्यरत होते. विद्यापीठाच्या धाराशिव उपपरिसर उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाबद्दल विद्यार्थ्यांसह राजकीय सामाजिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. या दाम्पत्याच्या पार्थिवावर धाराशिव जिल्ह्यातील रुईभर येथे रविवारी अंत्यसंस्कार होणार असल्याचे कुटुंबियांच्या नातेवाईक यांनी कळविले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदविधर आमदार सतीष चव्हाण म्हणाले, माझे व माने सरांचे अत्यंत जिव्हाळ्याचे व मैत्रीपूर्ण संबंध होते. कै.वसंतराव काळे यांचे ते निष्ठावान समर्थक होते. सन 2000 ते 2005 या कार्यकाळात मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा व्यवस्थापन परिषद सदस्य असताना अनेक वेळा विद्यापीठात माने सरांची भेट होत असे. विद्यापीठ व विद्यार्थी हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच आग्रही असायचे. शैक्षणिक प्रश्नांविषयाची तळमळ त्यांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवत असे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
