विशाखा कशाळकर संपादित ‘एकांकिका’ पुस्तकाचे 30 नोव्हेंबरला होणार प्रकाशन…
Visakha Kashalkar : ‘विशाखा कशाळकर प्रतिष्ठान’ निर्मित आणि अभिनेत्री विशाखा कशाळकर (Visakha Kashalkar) संपादित ‘एकांकिका‘ पुस्तकाचे प्रकाशन ३० नोव्हेंबरला होणार आहे. दादर येथील किर्ती महाविद्यालयातील सुसज्ज सभागृहात या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या उपस्थितीत हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
‘सुपरस्टार बहू कॉम्पिटिशन’ बाबत नकुल मेहताने केला मोठा खुलासा, म्हणाला…
किर्ती महाविद्यालयातील सुसज्ज सभागृहात सायंकाळी ५ ते रात्री ८:३० या वेळेत एकांकीका या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. अभिनेते मकरंद देशपांडे यांच्याखेरीच मनोरंजन विश्वातील कलाकार-तंत्रज्ञही ‘एकांकिका’च्या प्रकाशन सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.
नाटक ही सांघिक कला आहे. नाटक करायचे तर टीमची गरज लागते. उपजत लेखनकला एकलव्याप्रमाणे विकसित करणाऱ्या विद्यार्थिदशेतील लेखकांना त्यांच्याजवळील उपलब्ध संस्थेत, कॉलेजात बऱ्याचदा प्लॅटफॉर्म मिळत नाहीत. या हेतूने ‘विशाखा कशाळकर प्रतिष्ठान’च्या पुढाकाराने अभिनेत्री विशाखा कशाळकर यांनी ‘लेखकांसाठी खुला एकांकिका वाचन मंच’ स्पर्धा या उपक्रमाची निर्मिती केली होती.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या एकांकिकांमधून 3 एकांकिका वाचनासाठी निवडल्या जात. प्रत्येक एकांकिका वाचनासाठी 40 मिनिटांचा अवधी तर दर एकांकिका वाचून झाल्यावर 20 मिनिटांची खुली चर्चा केली जाई. उपस्थितीत प्रेक्षक, लेखक, सन्माननीय पाहुणे सारेचजण या चर्चेत भाग घेत. सर्वोत्कृष्ट एकांकिकेची निवड करण्यासाठी पुन्हा तिन्ही एकांकिकांबाबतीत तुलना करणारी मूल्यमापन चर्चा होई. चर्चेअंती गुप्त मतदानाद्वारे सर्वोत्कृष्ट एकांकिका लेखकाची निवड केली जाई. या अनोख्या प्रयोगाला, एकांकिका लेखकांनी भरघोस प्रतिसाद दिला. सहभागी झालेल्या एकांकिकामधून दर महिन्यात 3 याप्रमाणे 12 उपक्रमात 36 एकांकिका प्रेक्षकांसमोर वाचल्या गेल्या.
दरम्यान, या उपक्रमात महाराष्ट्रभरातून तब्बल १२४ नव्या संहिता या मंचासाठी लिहिल्या गेल्या. आता लेखन, वाचन, तज्ज्ञ व दर्शकांच्या उपस्थितीत चर्चा-मूल्यमापन ते १२ महिन्यातील १२ सर्वोत्कृष्ट एकांकिकांचे पुस्तक प्रकाशन होत आहे. स्वतः विशाखा कशाळकर यांनीच या पुस्तकाचे संपादन केले आहे.
या पुस्तकात विविध मान्यवरांचे, एकांकिका विषयावरचे अत्यंत महत्त्वाचे सहा अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळणार आहेत.
दरम्यान, पुस्तक प्रकाशनच्या दिवशी विशाखा कशाळकर त्यांच्या प्रतिष्ठानातर्फे, लेखकांना सन्मान देणाऱ्या नव्या उपक्रमाची उद्घोषणा करणार आहेत. हा नवा उपक्रमही दमदार असणार आहे.