“राजा तु चुकतोयस…” थेट ‘ट्रम्प’ यांना झापलं! कोण आहेत बिशप मॅरिएन?
‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष’ (President of America) म्हणजे जगातील सर्वात अधिकाराची आणि ताकदीची व्यक्ती. त्यामुळे या पदाविरोधात किंवा पदावरील व्यक्तीविरोधात बोलण्याचे धाडस शक्यतो कोणी करत नाही. कारण त्यांना बोलणे म्हणजे थेट अमेरिकेलाच (America) अंगावर घेण्यासारखे आहे. त्यातही नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांना झापणे तर लांबच, त्यांच्या विरोधातही बोलण्याचे धाडस कोण करत नाही. असे कोणी बोलल्यास किंवा वागल्यास त्या व्यक्तीचे जाहीरपणे वाभाडे काढायला ट्रम्प मागे पुढे बघत नाहीत. ट्रम्प यांच्यावर टीका करणाऱ्या माध्यमांना आणि नागरिकांनाही यापूर्वी त्यांनी धडा शिकवला आहे.
पण या सगळ्यानंतरही ट्रम्प यांना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी “राजा तु चुकतोयस” असे म्हणत त्यांना झापण्याचे धाडस बिशप मॅरिएन एडगर बुडे यांनी दाखवले आहे. त्यांचे भाषण सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ट्रम्प यांनीही मग असलेला थोडाफार सुसंस्कृतपणा गुंडाळून ठेवत चर्चबाहेर येऊन आपला संताप शेलक्या शब्दांत आणि शिव्या देऊन व्यक्त केला. त्याचमुळे बिशप मॅरिएन एडगर बुडे नेमक्या कोण आहेत, त्यांच्या टीकेचे काय महत्व आहे? आणि त्यांनी कोणत्या कारणावरून ट्रम्प यांना झापलंय? (Mariann Budde, the Episcopal bishop of Washington defended a plea for mercy she made to President Donald Trump on behalf of immigrants and others during an inaugural prayer service the day before.)
बिशप मॅरिएन या वॉशिंग्टन डायोसिसच्या बिशपपदावर नेमणूक झालेल्या पहिल्याच महिला आहेत. बुडे यांनी मिनेसोटामधील मिनियापोलिस येथील सेंट जॉन्स एपिस्कोपाल चर्चच्या रेक्टर म्हणून जवळजवळ दोन दशके काम केले आहे. त्या प्रोटेस्टेंट एपिस्कोपाल कॅथेड्रल फाउंडेशनच्या अध्यक्षाही आहेत. वाशिंगटन नॅशनल कॅथेड्रल आणि त्यांच्याशी सलग्न शाळांची देखरेख करण्याची प्रमुख जबाबदारी त्यांच्याकडे आहे. बिशप मॅरिएन बंदुक हिंसाचार प्रतिबंध, वांशिक समानता, स्थलांतरितांचे LGBTQ+ व्यक्तींचे हक्क आणि पर्यावरणीय काळजी यासारख्या मुद्द्यांवरही आवाज मांडत असतात.
राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी वायुवेगाने निर्णय घेतले आहेत. यातच, “अमेरिकेत फक्त स्त्री आणि पुरुष या दोनच लिगांना मान्यता असेल”, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. तसेच स्थलांतरितांना रोखण्यासाठाही ट्रम्प यांनी कडक निर्देश जारी केले आहेत. त्यांच्या या निर्णयावरून सध्या अमेरिकेत मोठा गहजब सुरू आहे. अशात ट्रम्प मंगळवारी वॉशिंग्टनच्या नॅशनल कॅथेड्रलमध्ये इनॉगरल प्रेयर सर्विसमध्ये गेले होते. ट्रम्प केवळ जन्माने ख्रिस्ती नाहीत तर Church Goer आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची शपथही त त्यांनी बायबलला स्मरुन घेतली. त्यामुळे ट्रम्प यांच्या या प्रेयरकडे अमेरिकेचे लक्ष लागले होते.
‘या’ देशात समलिंगी विवाह कायदा लागू, जोडप्यांनी आज थाटामाटात केलं लग्न
याच प्रेयरवेळी बिशप मॅरिएन एडगर बुडे यांनी आपल्या 15 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांना शेलक्या शब्दांत झापले आणि एका दयेचीही मागणी केली. त्या म्हणाल्या, “आपला देव आपल्याला आपण अनोळखी लोकांवर दया करावी, असे शिकवितो. कारण एकेकाळी आपणही या देशात अनोळखी होतो. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की आपल्या देशातील लोकांवर दया करा जे आता घाबरले आहेत. डेमोक्रॅटिक, रिपब्लिकन आणि स्वतंत्र कुटुंबांमध्ये समलिंगी आणि ट्रान्सजेंडर मुले आहेत, काहींना त्यांच्या जीवाची भीती वाटत आहे.
बिशप मॅरिएन यांनी स्थलांतरित कामगारांसाठीही आवाज उठवला. या कामगारांकडे भलेही ‘योग्य कागदपत्रे नाहीत, पण त्यापैकी बहुतेक जण ‘गुन्हेगार नाहीत’ तर ‘चांगले शेजारी’ आहेत, असे ट्रम्प यांना सुनावले. थोडक्यात “राजा तु चुकतोयस…” असे सर्वांसमक्ष सांगण्याचे धाडस बिशप मॅरिएन एडगर बुडे यांनी केले. पत्नी मेलोनियासोबत पुढच्या ओळीत बसलेल्या ट्रम्प यांचा वाक्यागणित तीळपापड होत होता. पण बिशप थांबल्या नाहीत. त्यांनी त्यांचे म्हणणे अगदी शांततेत मांडले. त्यांचे हे भाषण चांगलेच व्हायरल झाले.
ट्रम्प यांचा एक निर्णय! पाकिस्तान फसला, अफगाणी अडकले; नेमकं काय घडलं?
पण बिशप यांच्या भाषणावर ट्रम्प नाराज झाले आणि संतापलेही. चर्चबाहेर येऊन त्यांनी आपला संताप शेलक्या शब्दांत आणि शिव्या देऊन व्यक्त केला. तसेच बिशप यांनी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. मंगळवारी सकाळपासून बिशप यांना सोशल मिडीयावर ट्रोल केले जात आहे. “कट्टरपंथी, डावे आणि ट्रम्पविरोधी” अशा उपमा त्यांना देण्यात येत आहेत. चर्चाला अतिशय चुकीच्या पद्धतीने राजकारणात आणले अशी टीका त्यांच्यावर होत आहे. तुम्हाला काय वाटत? बिशप यांनी ट्रम्प यांना सुनावले ते योग्य आहे का? की त्यांनी खरंच चर्चाला अतिशय चुकीच्या पद्धतीने राजकारणात आणले? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा.