भारत-नेपाळ सख्खे शेजारी अन् व्यापारी; जाणून घ्या, दोन्ही देशांत किती होतो व्यापार?
कालपासून मात्र नेपाळमध्ये उग्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात काही जणांचा मृत्यूही झाला आहे.

Nepal Crisis : केपी शर्मा ओली नेपाळच्या (KP Sharma Oli) पंतप्रधानपदावर आल्यापासून नेपाळमध्ये अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. भारत आणि नेपाळ दोन्ही देशांतील संबंधही चांगले राहिलेले नाहीत. नेपाळ चीनच्या बाजूने जास्त झुकू लागला आहे. कालपासून मात्र नेपाळमध्ये उग्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात काही जणांचा मृत्यूही झाला आहे. सोशल मीडिया अॅपवर बंदी घातल्याने नेपाळमधील जनता रस्त्यावर उतरली. यातच भ्रष्टाचार, सरकार विरुद्धचा राग, भारताविरोधातील सरकारची भूमिका, चीनशी जवळीक असेही काही मुद्दे आहेत ज्यांनी लोकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले आहे.
नेपाळमधील सध्याच्या घडामोडींवर भारताची बारीक (Nepal Crisis) नजर आहे. यामागे खास कारण आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यांतील काही जिल्ह्यांच्या सीमा नेपाळला भिडतात. याव्यतिरिक्त नेपाळ भारतासाठी नेहमीच महत्वाचा राहिला (India Nepal Relation) आहे. नेपाळ भारताचा 14 वा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे. भारत नेपाळला 7 बिलियन डॉलरपेक्षा जास्त किंमतीच्या विविध वस्तू निर्यात करतो. तर नेपाळकडून 1 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तू भारतात आयात केल्या जातात.
दोन्ही देशांत 8 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त व्यापार होतो. दहा वर्षांपूर्वीची परिस्थिती पाहिली तर नेपाळ भारताचा 28 वा ट्रेड पार्टनर होता. परंतु, मागील काही वर्षांत दोन्ही देशांतील व्यापार सातत्याने वाढत गेला. तसं पाहिलं तर नेपाळ आणि भारताचे संबंध प्राचीन काळापासूनचे आहेत. नेपाळकडून भारताला अनेक वस्तूंचा पुरवठा केला जातो. तसेच नेपाळ अनेक गोष्टींसाठी भारतावर अवलंबून आहे.
नेपाळ अन् भारताचा व्यापार किती मोठा
2025 या आर्थिक वर्षात दोन्ही देशांत 8 बिलियन डॉलरपेक्षा जास्त व्यापार झाला आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या आकडेवारीनुसार 2025 या आर्थिक वर्षात भारताने 7334.87 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 65 हजार कोटी रुपयांच्या विविध वस्तू नेपाळला निर्यात केल्या होत्या. या बदल्यात भारताने नेपाळकडून 1201.48 मिलियन डॉलर म्हणजेच 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध वस्तू आयात केल्या होत्या. याचा अर्थ असा की भारत 54 हजार कोटींच्या ट्रेड सरप्लसमध्ये आहे. या व्यापारात भारताचा मोठा फायदा होतो.
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरून हाहाकार! पंतप्रधानांचा राजीनामा; वाचा, भारतातील नियम
मागील पाच वर्षांतील व्यापाराचा विचार केला तर सन 2020-21 मध्ये दोन्ही देशांत तब्बल 7,511.62 मिलयन डॉलर, 2021-22 मध्ये 11,016.79 मिलियन डॉलर, 2022-23 मध्ये 8,855.61 डॉलर, 2023-24 मध्ये 7827.09 मिलियन डॉलर आणि 2024-25 मध्ये 8536.35 मिलियन डॉलरचा व्यापार झाला होता. भारत विविध प्रकारच्या वस्तू नेपाळला देतो. यामध्ये पेट्रोलियम उत्पादनांचाही समावेश आहे. सरकारी पेट्रोलियम कंपनी आयओसीएलची नेपाळमध्ये मोठी गुंतवणूक आहे. इतकेच नाही तर नेपाळमध्ये तेल वितरणाचे काम देखील याच कंपनीकडे आहे. भारताकडून सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला जातो. यांसह लोखंड, स्टिल, ऑटो पार्ट्स, औषधे अशा वस्तू देखील नेपाळला पाठवल्या जातात.