महिला कोचचा विनयभंग: हरियाणाच्या क्रीडा मंत्र्यांचा राजीनामा

महिला कोचचा विनयभंग: हरियाणाच्या क्रीडा मंत्र्यांचा राजीनामा

चंदीगड : हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात क्रीडा विभागाच्या ज्यूनियर महिला कोचने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संदीप सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात एका महिला कोचचने चंदीगडमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. संदीप सिंह यांनी आपल्याविरोधात कट कारस्थान रचल्याचा आरोप केला आहे.

संदीप सिंह यांच्याविरोधात क्रीडा विभागाच्या ज्यूनियर महिला कोचने तक्रार दाखल केली होती. त्यात क्रीडामंत्र्यांवर विनयभंग व धमकावण्याचा आरोप केला होता. चंदीगडच्या सेक्टर-26 पोलिस ठाण्यात भादंवि कलम 354, 354ए, 354 बी, 342 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदीगड पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

महिला कोचने सांगितले की, 2016 रियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतल्यानंतर मी क्रीडा विभागात ज्यूनियर कोच म्हणून भरती झाले. त्यानंतर संदीप सिंह यांनी इन्स्टाग्राम व स्नॅपचॅटव त्यांना मेसेज पाठवले.

त्यानंतर मला चंदीगड सेक्टर 7 लेक साइडला भेटण्यासाठी बोलावले. मी गेले नाही. त्यामुळे ते मला इन्स्टाग्रामवर ब्लॉक-अनब्लॉक करत राहिले. महिला कोचच्या आरोपानुसार, 1 रोजी मंत्र्यांनी तिला स्नॅपचॅट कॉल केला. त्यात डॉक्यूमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी मला सेक्टर 7, चंदीगडमधील आपल्या निवासस्थानी बोलावले.

महिला कोचने सांगितले की, त्यानंतर त्या मंत्र्याच्या सरकारी निवासस्थानी पोहोचल्या. तिथे त्यांची कॅमेरा असणाऱ्या कार्यालयात बसण्याची इच्छा नव्हती. ते मला वेगळ्या कॅबिनमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी माझ्या मांडीवर हात ठेवला. तू मला खुश ठेव, मी तुला खुश ठेवेल असे ते म्हणाले. माझे म्हणणे ऐकले तर तुला सर्वच सुविधा व मनासारखी पोस्टिंग मिळेल असे ते म्हणाले.

महिला प्रशिक्षक गंभीर आरोप करत म्हणाल्या की, सायंकाळी 6.50 च्या सुमारास मंत्री संदीप सिंह यांनी तिचा विनयभंग केला. यावेळी त्यांचा टी-शर्ट फाटला. कशीतरी त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली.

महिला प्रशिक्षकाने आरोप केला की, मंत्र्याचे ऐकले नाही म्हणून माझी बदली करण्यात आली. माझे प्रशिक्षणही बंद झाले. या घटनेची तक्रार डीजीपी कार्यालय, सीएम हाऊस व गृहमंत्री अनिल विज यांच्याकडे करण्याचा मी प्रयत्न केला. पण कुठेही न्याय झाला नाही.

कनिष्ठ महिला प्रशिक्षकाने हरियाणा पोलिसांसह चंदीगड पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यात त्यांनी विनयभंगाच्या घटनेची तारीख 1 जुलै 2022 सांगितली आहे. त्यांनी मंत्र्यांच्या निवासस्थानापासून ते सुखना तलावापर्यंत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही केली आहे. महिला प्रशिक्षकाने असाही आरोप केला आहे की, नोकरी मिळण्यापूर्वी क्रीडामंत्र्यांनी तिला आधी मैत्री करण्यास सांगितले व नंतर गर्लफ्रेंड बनण्याचा प्रस्ताव ठेवला.

हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्यावर कनिष्ठ महिला प्रशिक्षकाने आरोप केल्यानंतर डीजीपींनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली. त्यात IPS ममता सिंह व समर प्रताप सिंह यांच्यासह HPS राजकुमार कौशिक यांचा समावेश आहे. ममता सिंह एसआयटीचे नेतृत्व करत आहेत. डीजीपींनी या प्रकरणाच्या संपूर्ण तपासाचा लवकर अहवाल मागवला आहे.

क्रीडामंत्र्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. ते म्हणाले की, माझ्याविरोधात कारस्थान रचण्यात आले आहे. मला त्यात नाहक गोवण्यात येत आहे. महिला कोच पंचकूलात राहण्यासाठी हे आरोप करत आहेत. याविषयी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे चौकशीचीही मागणी केली आहे. या प्रकरणाची माहिती त्यांनी सभापती ज्ञानचंद गुप्ता यांनाही दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube