Ismail Haniyeh : इराणमध्ये काय करत होता हनिया, कशी झाली हत्या? वाटा ए टू झेड
Ismail Haniyeh : इराणची राजधानी तेहरान शहरात हमास संघटनेचा (Hamas) म्होरक्या आणि इस्त्रायलचा कट्टर वैरी इस्माइल हनियाचा (Ismail Haniyeh) बुधवारी मृत्यू झाला. हनिया येथील एका अपार्टमेंटमध्ये मुक्कामी होता. हनियासह त्याच्या सुरक्षारक्षकाचाही अंत झाला आहे. हा हल्ला कुणी केला याचं उत्तर अजून सापडलेलं नाही. मात्र या हल्ल्यामागे इस्त्रायलचा हात (Israel Hamas War) असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मागील वर्षात 7 ऑक्टोबरचा दिवस इस्त्रायल कधीच (Israel) विसरू शकणार नाही. याच दिवशी इस्त्रायली शहरांवर हमासच्या अतिरेक्यांनी हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांच्या वेळीही हनिया हाच या संघटनेचा सूत्रधार होता. त्यामुळे चिडलेल्या इस्त्रायलने हमासच्या नेतृत्वाला संपवून टाकण्याची धमकी दिली होती.
इराणमध्ये काय करत होता हनिया?
इस्माइल हनिया इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियन यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तेहरानमध्ये आला होता. या दरम्यान त्याने इराणी राष्ट्रपतींसह देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमोनी यांचीही भेट घेतली होती. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. इराणने हनियाला राजकीय अतिथीचा दर्जा दिलेला आहे.
कशी झाली हनियाची हत्या
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इस्माइल हनिया इराणी राष्ट्रपतींच्या शपथविधीसाठी तेहरानमध्ये येणार याची माहिती इस्त्रायलला आधीच मिळाली होती. इस्त्रायलच्या गुप्तचर यंत्रणांनी हनियावर बारकाईने नजर ठेवली आणि त्याच्या राहण्याच्या ठिकाणांची अचूक माहिती इस्त्रायली सैन्याला पाठवली. यानंतर अगदी अचूक वार करण्यास सक्षम असलेल्या गाइडेड मिसाइलच्या मदतीने हनिया राहत असलेल्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. या हवाई हल्ल्यात हमासचा म्होरक्या इस्माइल हनिया आणि त्याच्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला.
इस्त्रायलचा बदला! चोवीस तासांच्या आत दोन कट्टर शत्रूंचा खात्मा; कारवाईने खळबळ
इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरीशी निगडीत फार्स न्यूजच्या रिपोर्टनुसार बुधवारी मध्यरात्री दोन वाजता एरियल प्रोजेक्टाइलमुळे हनियाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. पण हे एरियल प्रोजेक्टाइल नेमकं काय आहे याची सविस्तर माहिती देण्याचं टाळण्यात आलं.
इऱाणमध्येच हत्या, इस्त्रायलचा सेफ गेम
इस्माइल हनिया जास्त काळ कतरमध्येच राहत असायचा. कतरची राजधानी दोहा शहरात हमासचे राजकीय कार्यालय सुद्धा आहे. त्यामुळे इस्त्रायल चुकूनही कतरमध्ये हनियावर हल्ला करू शकत नव्हता. यामागे अनेक कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे खाडी देशांतील कतर हा अमेरिकेचा निकटवर्तीय आहे. दुसरं म्हणजे कतरमध्ये हल्ला करायचा म्हटलं तर इस्त्रायल जास्त मेहनत करावी लागली असती तसेच या हल्ल्याची किंमतही चुकवावी लागली असती. तरी देखील इस्त्रायलने ही कारवाई केली असती तर मग अमेरिकेनेही साथ दिली नसती. हनिया तुर्कीतही जात होता. पण तुर्की नाटो संघटनेचा सदस्य देश आहे. त्यामुळे इस्त्रायल तुर्कीतही हनियावर हल्ला करू शकत नव्हता.
कोण होता इस्माइल हनिया?
इस्माइल हनिया हा एक पॅलेस्टिनी नेता होता. सन 1962 मध्ये गाझा पट्टीतील एका शरणार्थी शिबिरात त्याचा जन्म झाला होता. हमास संघटनेचा प्रमुख बनल्यानंतर सन 2019 मध्ये हनियाने गाझा सोडले होते. हमासची लीडरशीप मिळाल्यानंतर हनियाचा प्रभाव वाढला होता. त्याच्या देखरेखीत मागील वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर मिसाइलने हल्ले करण्यात आले होते. हनियाच्या मृत्यूची जबाबदारी अजून कोणीही घेतलेली नाही. तरी देखील इराणी मीडिया मात्र इस्त्रायलला जबाबदार धरत आहे.
हमासमध्ये सहभाग कधी
इस्माइल हनिया सन 1987 मध्ये हमास संघटनेत सहभागी झाला होता. सन 2017 पासून हनिया या संघटनेचा चीफ पॉलिटिकल लीडर बनला होता. हमासमध्ये निर्णय घेणारी सर्वात मोठी समिती शूरा परिषदेने 2021 मध्ये हनियाला आणखी चार वर्षांसाठी नियुक्ती मिळाली होती. संघटनेत हनियाचा प्रभाव इतका जास्त होता की त्याला आव्हान देणारा दुसरा कोणताच नेता येथे नव्हता. यामुळेच हनियाची बिनविरोध निवड झाली होती. हमासचा प्रमुख असल्याने इस्त्रायल हनियाला आपला कट्टर शत्रू मानत होता. आता त्याचा खात्मा झाला आहे. याआधी हिजबुल्ला संघटनेचा टॉप कमांडर फुआद शूकर यालाही इस्त्रायलने ठार मारले.