राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रा 2’ ची तयारी
नवी दिल्ली : कन्याकुमारीपासून निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता पंजाबमध्ये पोहचलीय. 22 जानेवारीला जम्मू-काश्मिरमध्ये प्रवेश करणार आहे, तर 30 जानेवारीला भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. यानंतर भारत जोडो यात्रेच्या दुसरा टप्प्यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे.
येत्या 2 ऑक्टोबरपासून गुजरातमधून ‘भारत जोडो यात्रा 2’ सुरू करण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे कळते. गुजरातमधून निघणारी ही यात्रा अरुणाचल प्रदेशपर्यंत चालणार आहे. भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात 3 हजार 100 किलोमीटरचा प्रवास असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. येत्या 30 जानेवारीला या यात्रेची सांगता होणार असून त्याची जय्यत तयारी काँग्रेसने सुरू केली आहे.
जवळपास साडेतीन हजार किलोमीटरचा रस्ता या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी पूर्ण केला. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेली भारत जोडो यात्रा विविध माध्यमातून चर्चेत राहिली होती.
त्यानंतर आता यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. 2 ऑक्टोबर 2023 पासून ती सुरू करण्याचा विचार आहे. गुजरात येथील साबरमती आश्रमापासून ही यात्रा सुरु केली जाणार असल्याचे कळते.
गुजरातपासून सुरू होणारी ही यात्रा अरुणाचल प्रदेशपर्यंतचे अंतर कापणार असून जवळपास 3100 किलोमीटरचा प्रवास याद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे. ही यात्रा सुमारे 140 ते 150 दिवस चालणार आहे.
अरुणाचल येथील परशुराम कुंड येथे ही यात्रा संपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता भारत जोडो दुसरा टप्पा सुरू करण्याचा काँग्रेसचा मानस असल्याची माहिती पुढे आली आहे.
काँग्रेसतर्फे हाथ से हाथ बढाओ ही यात्राही सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतही या यात्रेचा टप्पा असून त्यासाठी उद्या, १२ जानेवारी रोजी मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली.