झेलेन्स्कींनी अखेरची संधीही गमावली, खनिजांची डील अधांतरी; युरोपचीही होणार कोंडी

झेलेन्स्कींनी अखेरची संधीही गमावली, खनिजांची डील अधांतरी; युरोपचीही होणार कोंडी

Ukraine Mineral resources deal with US : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात वाद झाले. थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी हुज्जत घालणं झेलेन्स्की यांना चांगलंच महागात पडलं. अपमानित होऊन अमेरिकेतून बाहेर पडावं लागले. तसेच अमेरिकेने युक्रेनबरोबरील खनिजांची डीलही रद्द केली आहे. ही एकच डील युक्रेनच्या बाजूने जात होती. या डीलच्या मोबदल्यात युक्रेन अमेरिकेला सुरक्षेची हमी मागत होता. आताही वाद झाल्यानंतर युक्रेनने आशा सोडलेल्या नाहीत. या डीलसाठी आम्ही अजूनही तयार आहोत असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. मग ही डील नेमकी आहे तरी काय? अमेरिका आणि युक्रेनचा यात काय फायदा होणार आहे? युक्रेनमध्ये खरंच इतकी खनिजे आहेत का? याची माहिती घेऊ या..

अमेरिकी जिओलोजिकल सर्वे आणि अन्य एक्स्पर्टवर विश्वास ठेवला तर युक्रेनमध्ये खनिज तत्त्वांचे मोठे साठे असल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करत सांगितले होते की अमेरिका युक्रेनबरोबर एक ट्रिलियन डॉलर्सचा करार करणार आहे. दोन्ही देशांतील या डीलमुळे अमेरिकेला युक्रेनमधील खनिज संपत्तीपर्यंत सहज पोहोचता येणार आहे. पण विशेषज्ञ आणि अमेरिकी अधिकाऱ्यांनुसार युक्रेनमध्ये खनिजांचे कोणतेही प्रमाणित साठे नाहीत. यूएस जिओलोजिकल सर्वेनुसार युक्रेनमध्ये दुर्लभ खनिजांचे कोणतेही साठे नाहीत. तसेच या खनिजांवर प्रक्रिया करण्यासाठी कोणत्याही सुविधा येथे उपलब्ध नाहीत.

युक्रेनमध्ये ग्रेफाईट, लिथियम आणि टायटेनियम यांसारखे महत्त्वाचे खनिजे आढळतात. परंतु अन्य देशांच्या तुलनेत हे साठे फार जास्त नाहीत. एनर्जी इनोव्हेशनचे वरिष्ठ विश्लेषक जॅक कोनेस यांच्यानुसार जागतिक पातळीवर पहिले तर युक्रेनमधील खनिजांचे साठे फार नाहीत. युक्रेनमध्ये नेमके काय आहे याची व्यवस्थित माहिती अजूनही आपल्याकडे नाही.

अमेरिकेला झटका! युक्रेन अन् ब्रिटनमध्ये मोठी डील, युक्रेनला मिळणार अब्जावधींचे कर्ज..

दरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी (Volodymyr Zelenskyy) सप्टेंबर महिन्यात अमेरिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी व्हिक्ट्री प्लॅन अंतर्गत हा प्रस्ताव दिला होता. अमेरिकेने जर युक्रेनला मदत कायम ठेवली तर या मोबदल्यात अमेरिकेला देशातील प्राकृतिक संसाधनापर्यंत पोहोच दिली जाईल. आधीच्या बायडन प्रशासनातील एका माजी अधिकाऱ्याने CNN ला सांगितले की या प्रस्तावावर कधीच गांभीर्याने विचार करण्यात आला नाही. एका अन्य अधिकाऱ्यानुसार एकही अमेरिकन कंपनी युक्रेनमध्ये खनन व्यवसायात उतरण्यास तयार नाही.

अमेरिकेने सूचीबद्ध केलेल्या 50 पैकी 22 महत्त्वपूर्ण खनिजांचे साठे युक्रेनमध्ये (Ukraine) आहेत. परंतु यातील बहुतांश साठे पूर्व भागात आहेत. या भागावर रशियाचा कब्जा आहे. तसेच युद्धामुळे येथील परिस्थिती (Russia Ukraine War) धोकादायक झालेली आहे. बायडेन प्रशासनातील एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की बहुतांश खनिज साठे एकतर रशियाचे नियंत्रण असलेल्या भागात आहेत किंवा अशा ठिकाणी आहेत जिथे सुरुंग आणि युद्धाशी संबंधित अन्य धोके आहेत.

या भागातून खनिजे बाहेर काढून त्यावर प्रक्रिया करणे अतिशय खर्चिक आणि वेळखाऊ काम आहे. या डीलमध्ये काही अडचणी सुद्धा आहेत. त्यामुळे आता जितके सांगितले जात आहे तितकी ही डील फायद्याची नक्कीच ठरणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ही वस्तुस्थिती स्वीकारली आहे.

अमेरिकेकडून युक्रेनला दिल्या गेलेल्या आर्थिक मदतीची भरपाई होईल असा उल्लेख या डीलच्या ड्राफ्टमध्ये कुठेच नाही अशी माहिती आहे. त्याऐवजी एक रिकन्स्ट्रक्शन इन्व्हेस्टमेंट फंड तयार करण्याचा उल्लेख यात आहे. या अंतर्गत नैसर्गिक साधनसंपत्तीचा उल्लेख तेल, प्राकृतिक गॅस, खनिज या रूपात करण्यात आला आहे. या डीलचा अमेरिकेला आर्थिक फायदा होईल असे डोनाल्ड ट्रम्प सरकारला वाटते. तसेच या माध्यमातून युक्रेनला सुरक्षेची हमी देखील देता येईल. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्टज म्हणाले की अमेरिकेने ज्या संपत्तीत गुंतवणूक केली आहे त्या संपत्तीचे रक्षण केले जाईल. युक्रेनसाठी देखील ही मोठी संधी ठरू शकते.

Video : ट्रम्प अन् झेलेन्स्कींमधील ऑन कॅमेरा फाईट मिस झालीये?; ‘हे’ 10 मुद्दे तुम्हाला सर्वकाही सांगतील…

दरम्यान सध्या रशियाची अर्थव्यवस्था (Russian Economy) कमकुवत झाली आहे. तरीसुद्धा युद्ध सुरू ठेवण्यासाठी आवश्यक संसाधने आणि जनशक्ती रशियाकडे अजूनही आहे. युक्रेनची परिस्थिती मात्र वेगळी आहे. सैन्याची घटत जाणारी ताकद आणि लाखो नागरिकांचे देशातून पलायन या मोठ्या समस्या युक्रेनसमोर आहेत. अमेरिकेला देण्यासाठी आता झेलेन्स्की यांच्याकडे फार काही शिल्लक राहिलेले नाही. पण झेलेन्स्की यांना माहिती आहे की हा असा एक व्यवहार आहे ज्याकडे ट्रम्प प्रशासन नक्कीच आकर्षित होईल. परंतु, आता ही डील करायची की नाही याचा निर्णय अमेरिकाच घेईल. झेलेन्स्की यांच्या हातात काहीच राहिलेले नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube