मुश्रीफांची 10 जागांची मागणी, मात्र 9 जागांचा फॉर्म्युला; गोकुळच्या जागावाटपावरून महायुतीत वादाची शक्यता
मंत्री हसन मुश्रीफ यांनी मागणी केलेल्या दहा जागांऐवजी त्यांच्या वाट्याला नऊ जागा येत असल्याने हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
New dispute within the Mahayuti over seat-sharing for Gokul : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा तिढा स्थानिक पातळीवर सुटत नसल्याने अखेर हा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गोटात गेला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जागावाटपाचा 9-7-7-2 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या फॉर्म्युल्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजीची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. विशेषतः मंत्री हसन मुश्रीफ यांनी मागणी केलेल्या दहा जागांऐवजी त्यांच्या वाट्याला नऊ जागा येत असल्याने हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र याच नऊ जागांमधून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना उमेदवारी द्यावी लागणार असल्याने मुश्रीफ गटात नाराजी निर्माण झाली आहे. यड्रावकर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे यड्रावकरांना नेमकी कोणत्या पक्षाच्या कोट्यातून उमेदवारी द्यायची, यावरूनही महायुतीमध्ये आधीपासूनच मतभेद असल्याचे चित्र आहे.
महायुतीतील जागावाटप ठरावांच्या संख्याबळाच्या आधारे होईल, असा दावा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. मात्र आता पक्षीय पातळीवर जागावाटप होत असल्याचे प्राथमिक चित्र दिसत आहे. त्यामुळे ठरावांची संख्या आणि प्रत्यक्ष मिळणाऱ्या जागा यामध्ये तफावत असल्याने घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.
‘मला नमाज पठण करायचंय…’ विचारलं अन को-पायलटचा हल्ला; कॅप्टन स्मित मच्छारांनी सांगितला थरारक अनुभव
गोकुळच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक ठराव असल्याचा दावा केला जात आहे. ए. वाय. पाटील यांच्या सहभागानंतर राष्ट्रवादीकडे जवळपास दोन हजार ठराव असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे भाजपकडे सुमारे 1300, तर शिवसेनेकडेही सुमारे 1300 ठराव असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादीकडून दहा जागांची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तिप्रदर्शन करत मोठ्या संख्येने ठराव दाखल केले होते. यामध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या गटाचेही ठराव असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे यड्रावकरांना मुश्रीफ यांच्या कोट्यातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी महायुतीतील काही घटकांकडून करण्यात आली. तर यड्रावकरांनी शिवसेनेच्या माध्यमातूनही ठराव दाखल केल्याने त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून जागा मिळावी, अशी मागणीही पुढे आली होती.
शिवसेनेला स्वतंत्र सात जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र यड्रावकरांना मुश्रीफ यांच्या कोट्यातून जागा दिली जाणार असल्याने मंत्री हसन मुश्रीफ नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. ही नाराजी त्यांनी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवल्याचेही सांगितले जात आहे. दुसरीकडे भाजपकडे सुमारे 1300 ठराव असताना भाजपच्या वाट्याला सात जागा येत आहेत. मात्र भाजपचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्तीनेही भाजपसोबत एकत्रितपणे शक्तिप्रदर्शन करत ठराव दाखल केले होते. त्यामुळे भाजप आणि जनसुराज्य शक्ती यांचा एकत्रित विचार केल्यास त्यांच्या वाट्याला नऊ जागा येत असल्याचे चित्र आहे.
‘ज्ञानेश कुमारच नाही, मोदी-शाहांनाही घरी जावं लागेल’, संजय राऊतांचा मोठा दावा
त्यामुळे सध्याच्या चर्चेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ आणि भाजपला नऊ जागा, तर शिवसेनेला सात आणि जनसुराज्य शक्तीला दोन जागा असा फॉर्म्युला असल्याचे समोर येत आहे. मात्र या जागावाटपात ठरावांच्या संख्याबळापेक्षा पक्षीय समीकरणांना अधिक महत्त्व दिल्याची भावना निर्माण झाल्याने महायुतीमध्ये पुन्हा वादाची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना जागावाटपाबाबतचा निरोप दिल्याची माहिती आहे. ठरावांच्या संख्याबळानुसार जागावाटप होईल, अशी अपेक्षा असताना पक्षीय पातळीवरच जागावाटप होत असल्याचे प्राथमिक चित्र आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
पुण्यातील एमपीएससी सत्याग्रह आंदोलनाला राहुल गांधींचा जाहीर पाठिंबा, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारला घेरलं
विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजपला प्रत्येकी नऊ जागा मिळत असल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना संधी मिळणार असल्याची चर्चा असल्याने मुश्रीफ गटासाठी हा निर्णय धक्का मानला जात आहे. त्यामुळे मुश्रीफ आपली नाराजी वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती असून, या नाराजीमुळे गोकुळच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय पुन्हा रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.