काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्षांच्या ग्राऊंडवरचा नेता भाजपच्या गळाला, पक्षप्रवेश कधी?
Congress : माजी जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्याने काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास (Congress) आघाडीतील पक्षांना बसणाऱ्या राजकीय धक्क्यांची मालिका कायम असताना आता बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. त्यामुळे चिखलीसह बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात या घडामोडीने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
राहुल बोंद्रे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसने आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात अनेक संधी, पदे तसेच जिवाभावाची माणसे दिल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसमधील आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी पक्षातील सहकाऱ्यांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली आहे.
काँग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल; 130 नेत्यांची यादी तयार, राहुल गांधी कुणाला देणार संधी?
मुकुल वासनिक यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात करून दिली आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले, असे बोंद्रे यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भावाप्रमाणे प्रेम दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला. मात्र, राजकीय वाटचालीच्या नव्या टप्प्यावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुन्या सहकाऱ्यांना आपण कधीही विसरणार नसल्याचेही त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशामुळे चिखली विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या बोंद्रे यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाची अधिकृत तारीख आणि पुढील राजकीय भूमिका याकडे आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.