तुमच्या रागात सामील होण्यासाठी आलोय; तुमचं जे दु:ख तेच आमचंही, राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनात एल्गार
Raj Thackeray Pune Students Protest : पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देत राज ठाकरे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला.
Raj Thackeray Pune Students Protest : अनेक लोक या आंदोलनाला भेट देण्यासाठी आले, ते म्हणाले आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्या मागण्यांसोबत आहोत. परंतु मी जो आलोय ते तमुच्या रागात सामील होण्यासाठी आलो आहे. हा तुमचा राग कमी होता कामा नये. (MPSC) सरकारी फसवणुकीमुळं आपल्या आयुष्यातील उमेदीचा काळ कसा निघून जातो हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कुणी चांगलं सागणार नाही. आमच्याकडं मत फुटतात, तुमच्याकडं परीक्षेचे पेपर फुटतात. जसा तुमच्या आयुष्यातील वेळ निघून जातो, तसा आमच्याही आयुष्यातील वेळ निघून जातोय असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे पुण्यात आंदोलक विद्यार्थ्यांना भेट देत सरकारवर घणाघाती वार केले. यावेळी आमदार रोहित पवार आणि आंदोलक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी अनेक वर्षे सांगत आलो की जातीपातीच्या राजकारणात पडू नका. जातीय राजकारणात तुम्हाला अडवलं जातं. यातच तुमचा वेळ गेला तर आई-वडिलांना काय तोंड दाखवणार. आम्ही जाती-पातीमध्ये पडलो आहोत. आपण हिंदू-मुसलमान यात पडलो आहोत. यातून अगोदर बाहेर या. आज माझ्या मराठवाड्यातील अनेकजण पुण्यात शिकायला आलेली आहेत. रोज अभ्यास करत आहेत. पण नशिबी पेपर फुटला एवढंच येतं.
तुमचा हा राज असाच कायम असणं गरजेचं आहे. मी कडवट बोलतो पण सत्य बोलतो. अनेक लोकांना माझं बोलणं त्या वेळेला झेपत नाही. पण कालांतराने समजतं की मी सत्य बोलतोय 70 हजार तरुणांची पदभरती व्हावी अशी मागणी केली जातेय. पण हे होणार नाही. लक्षात ठेवा. दुसरंं सरकार आलं तरीही ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही. परीस्थिती समजून घ्या. वस्तुस्थिती समजून घ्या. पण नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. मी 22 वर्षांपासून सतत सांगतोय की महाराष्ट्रातील नोकऱ्या या महाराष्ट्रातील मुला-मुलींनाच मिळाल्या पाहिजेत. हे जर झालं तर अशा आंदोलनांची गरजच नाही.
आपण आरक्षण मागतो. पण सरकारी नोकऱ्या आहेत कुठे. जे मिळेल ते खासगी होत चाललंय. त्यासाठीच केंद्र सरकार बसलं आहे. विमानतळ, पोर्ट दिसलं की दे अडाणीला असं चालूय. सगळं खासगी होत चाललंय. खासगी क्षेत्रात आरक्षण नाही. तसंच, निवडणुका येतात तेव्हा जेवणावळी दिल्या जातात. दारू दिली जाते. निवडणुकीच्या वेळी पैसे फेकले की ते आपल्याला निवडून देणार हे नेत्यांना माहिती आहे. अशा नेत्यांचा हा गैरसमज जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही.