जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान सचिन तेंडुलकरांची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या भावनांना दिला आवाज
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आपली भूमिका मांडली आहे.
Sachin Tendulkar’s post sparks discussion : नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याचे सांगितले जात असून काही विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे घटनांनी देखील चिंता वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक गटांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
दिल्लीतील जंतर मंतर येथे गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी देखील पाठिंबा देऊन आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पहिले दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान काल रात्री भाजपचे मंत्री जे. पी. नड्डा यांनी सोनम वांगचुक यांची रुग्णालयात भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या चर्चेत त्यांनी मांडलेले मुद्दे सोनम वांगचुक यांना पटले असल्याने त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.
पेपरफुटी संघटीत गुन्हा, कठोर कायदा आणा अन्… रोहित पवारांची मोठी मागणी
20 जुलै रोजी हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला असून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर देशभरातून संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आपली भूमिका मांडली आहे. सामाजिक माध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या वडिलांनी दिलेल्या शिकवणीचा उल्लेख केला.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 23, 2026
सचिन तेंडुलकर म्हणाले, माझे वडील प्राध्यापक होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मला लहानपणापासून एक महत्त्वाची गोष्ट शिकवली होती अपयश स्वीकारता येते, पण फसवणूक कधीही स्वीकारता येत नाही. कोणताही शॉर्टकट घेऊ नका. समाजातील प्रौढ व्यक्ती म्हणून योग्य मूल्यांची जपणूक करणे आणि पुढील पिढीला योग्य दिशा देणे ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा समाज कठोर परिश्रमापेक्षा केवळ निकालाला अधिक महत्त्व देतो, तेव्हा गुणवत्तेपेक्षा शॉर्टकटला प्रोत्साहन मिळते.
विद्यार्थ्यांच्या भावनांबाबत बोलताना सचिन यांनी पुढे म्हटले, आज अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळाले नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांची निराशा स्वाभाविक आहे. भविष्यात कोणत्याही विद्यार्थ्याला अशी भावना निर्माण होणार नाही, यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारताची तरुण पिढी ही स्वप्नांनी आणि ऊर्जेने भरलेली आहे. देशाच्या प्रगतीचा पाया हीच तरुणाई आहे. पालक, शिक्षक, मित्र, नातेवाईक, शैक्षणिक संस्था आणि प्रशासन या सर्वांची जबाबदारी आहे की, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास टिकून राहावा आणि त्यांना न्याय्य व पारदर्शक व्यवस्था मिळावी.
सचिन तेंडुलकर यांच्या या प्रतिक्रियेनंतर नीट परीक्षेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेला आणखी वेग आला असून विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.