हा विषय फक्त नीटचा नाही, देशभरातील जनतेचा संताप आहे; जंतर-मंतरहून परतल्यानंतर उद्धव ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल

मुंबईत आयोजित ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेवर जोरदार टीका केली.

  • Written By: Published:
Untitled Design (80)

Uddhav Thackeray criticizes the Central Government : नीट परीक्षा आणि कथित पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता राष्ट्रीय पातळीवर मोठे स्वरूप धारण केले आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात विविध विरोधी पक्षांचे नेते सहभागी होत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील नुकतीच आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकार, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, हा विषय केवळ नीट परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. देशभरातील विविध घटकांमध्ये साचलेला असंतोष आता या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. जंतर मंतरवर भेटीदरम्यान त्यांना अनेक विद्यार्थी, तरुण आणि सर्वसामान्य नागरिक भेटल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी एका व्यक्तीचा उल्लेख करत सांगितले कि, नोटबंदीनंतर आपला व्यवसाय उध्वस्त झाल्याने तो व्यक्ती संताप व्यक्त करण्यासाठी आंदोलनात सहभागी झाला होता. लोक फक्त एका मागणीसाठी नाही, तर अनेक वर्षांपासून साचलेला राग व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

असे ठाकरे म्हणाले. आंदोलनादरम्यान काही विद्यार्थिनींनी आपल्याशी संवाद साधल्याचे सांगत ठाकरे यांनी गंभीर आरोप देखील केले आहेत. विद्यार्थिनींनी आंदोलनादरम्यान त्यांच्यावर मारहाण झाल्याचा, कपडे फाटल्याचा आणि पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आल्याचा दावा केल्याचे त्यांनी नमूद केले. या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

झुरळांना जन्माला घालणारे CJI अन् आता… राज ठाकरेंनी मोदींपासून पवारांपर्यंत सगळ्यांना सडकवलं

न्यायव्यवस्थेवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना आंदोलनकर्त्यांमध्ये आहे. देशातील तरुण न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र त्यांच्या वेदना आणि प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे, असे त्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत केवळ सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांच्याशी थेट संवाद साधणे आवश्यक होते. आंदोलनाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांशी चर्चा झाली असती, तर परिस्थिती एवढी चिघळली नसती, असे ठाकरे म्हणाले.

आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. काही ठिकाणी साध्या वेशातील व्यक्तींकडे पोलिसांच्या लाठ्या दिसल्याचा दावा करत त्यांनी अशा प्रकारांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली. आंदोलन मोडून काढण्यासाठी अतिरेकी बळाचा वापर होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील तरुणांमध्ये निर्माण झालेला रोष आणि असंतोष व्यक्त होण्यासाठी लोकशाही मार्गाने संधी मिळाली पाहिजे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाला पाठिंबा कायम ठेवण्याची भूमिका व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने संवाद साधावा आणि त्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

follow us