ग्लूकोमा नक्की काय? काळ्या मोतीबिंदूमुळे अंधत्वाचा धोका.. जाणून घ्या, लक्षणे अन् उपचार

Glaucoma Disease : काचबिंदू म्हणजेच काळा मोतिबिंदू.. हा डोळ्यांचा अतिशय घातक आजार आहे. यावर वेळेत उपचार केले नाहीत अंधत्व येण्याचाही धोका असतो. रिपोर्ट्सनुसार भारतात 1.19 कोटी लोक काळ्या मोतिबिंदूने ग्रस्त आहेत. देशभरात 12.8 टक्के अंधत्वास काचबिंदू किंवा काळा मोतिबिंदू हाही एक घटक कारणीभूत आहे. ज्या व्यक्तीला काळा मोतीबिंदू होतो खरंतर त्याला या आजाराची माहिती बऱ्याच उशिराने कळते.
डोळ्यांना कमी दिसू लागल्यानंतर किंवा अस्पष्टता येते त्यावेळेस या आजाराची माहिती होते. ज्यावेळी डोळ्यांत दबाव जाणवू लागतो त्यावेळी दृष्टीच्या नसांना इजा पोहोचण्यास सुरुवात होते असे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरवर्षी 12 मार्च रोजी जागतिक ग्लूकोमा दिन (World Glaucoma Day) आयोजित केला जातो. या आजाराची लोकांना माहिती व्हावी यासाठी आठवडाभर विविध उपक्रम आयोजित केले जातात. नेत्रतपासणी शिबिरेही भरवली जातात. डोळ्यांचा हा आजार नेमका काय आहे? यापासून बचाव करण्यासाठी काय खबरदारी घेता येईल याची माहिती घेऊ या..
ग्लूकोमा आजार का होतो
डोळ्यांच्या आत दबाव वाढू लागला की यामुळे डोळ्यांच्या नसांना इजा होते. यामुळे काळा मोतीबिंदू होण्याचा धोका वाढतो. सुरुवातीची लक्षणे हलकी असतात त्यामुळे व्यक्तीच्या लवकर लक्षात येत नाही. यामध्ये प्रायमरी ओपन अँगल ग्लूकोमा, अँगल क्लोजर ग्लूकोमा, न्युरोपॅथी ग्लूकोमा आणि जन्मजात ग्लूकोमा या प्रकारांचा समावेश आहे. प्रायमरी ओपन अँगल ग्लूकोमा हा बहुतांश लोकांना होतो. यामध्ये डोळ्यांना हळूहळू नुकसान होते. तर अँगल क्लोजर ग्लूकोमात डोळ्यांत वेदना, जळजळ आणि धुसर दृष्टी अशा समस्या जाणवतात. तिसऱ्या न्युरोपॅथी ग्लूकोमात डोळ्यांचा नसांना जास्त प्रमाणात इजा होते. यामुळे अंधत्व येण्याची शक्यता असते.
सावधान! 2050 पर्यंत ‘हा’ आजार अडीच कोटी लोकांना ग्रासणार; औषध नाही पण सावध तर व्हा!
काळ्या मोतीबिंदूची लक्षणे काय
या आजाराची काही समान लक्षणे आहेत. यामध्ये धुसर दिसणे, रात्रीच्या वेळी कमी दिसणे किंवा काहीच न दिसणे, डोळ्यांत वेदना किंवा जडपणा तसेच अचानक दृष्टी जाणे या लक्षणांचा समावेश आहे. हा आजार काही वेळेस अनुवांशिक असू शकतो. तसेच डोळ्यांना जखम झाल्यास, वय वाढत गेल्यास, उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास, डोळ्यांत इन्फेक्शन तसेच व्यक्तीला मधुमेह असल्यास काळा मोतीबिंदू होऊ शकतो. जर डोळ्यांना अशा प्रकारच्या समस्या जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांकडून उपचार सुरू करा.
काय खबरदारी आवश्यक
काळा मोतीबिंदू पुर्णपणे ठीक केला जाऊ शकत नाही असे मानले जाते. परंतु, या आजारावर नियंत्रण नक्कीच मिळवता येते. यासाठी औषधे, लेझर सर्जरी आणि शस्त्रक्रियेची मदत घेता येते. तसेच अन्य काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात. यामध्ये डोळ्यांची नियमित तपासणी, डोळ्यांची सुरक्षितता या गोष्टी महत्वाच्या आहेत.