सावधान! भारतातील 45 कोटी लोकांवर ‘या’ आजाराचे संकट, सावध व्हा अन् लाईफस्टाईल बदला

Obesity Problem in India : खराब खानपान आणि लाईफस्टाईल यांमुळे लठ्ठपणाची समस्या (Obesity) वेगाने वाढू लागली आहे. तसेच या समस्येचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजार बळावण्याचा धोका असतो. मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. शोधकर्त्यांचे म्हणणे आहे की सन 2050 पर्यंत भारतात 25 वर्षापेक्षा जास्त वयाचे तब्बल 45 कोटी लोक लठ्ठपणाच्या विळख्यात अडकलेले असतील. दरम्यान, देशातील नागरिकांच्या वाढत्या लठ्ठपणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ‘मन की बात’ मध्ये भाष्य करत चिंता व्यक्त केली होती.
अहवालात नेमकं काय?
लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार या यादीत चीन पहिल्या (China) क्रमांकावर आहे. चीनमध्ये 2050 पर्यंत 62 कोटींपेक्षा जास्त लोक लठ्ठपणाने ग्रस्त असतील. अमेरिकेत ही संख्या 21.4 कोटींपर्यंत पोहोचलेली असेल. लठ्ठपणाच्या समस्येत वाढ होण्याचे मुख्य कारण चुकीचे लाईफस्टाईल आणि खराब आहार आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मोठी माणसेच नाही तर लहान मुले सुद्धा लठ्ठपणच्या विळख्यात अडकू लागली आहेत.
जगात लठ्ठपणाचा किती धोका
जगभराचा विचार केला तर सन 2050 पर्यंत सगळ्या जगात तब्बल 380 कोटी लोक या समस्येने पीडित असतील. यातील 195 कोटी लोक गंभीर श्रेणीत येऊ शकतील. यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका राहील. खराब लाईफस्टाईल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळेच लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे असे नाही तर ही समस्या जेनेटिक सुद्धा असते. काही वेळेस हार्मोन देखील यासाठी कारणीभूत ठरू शकतात. आई वडील लठ्ठ असतील तर हा आजार त्यांच्या मुलांमध्ये येण्याची शक्यता असते. यामुळे अशा व्यक्तींच्या शरीराच्या उर्जेची मागणी जास्त असते. यामुळे त्यांची भूक जास्त असते.
जेनेटिक आणि हार्मोन्सची भूमिका काय
हेल्थ एक्स्पर्ट डॉ. समीर भाटी यांच्या मते कुटुंबात लठ्ठपणाचा इतिहास असेल तर मुलांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. हे सर्व जेनेटिक असू शकते. काही प्रकरणात हार्मोन्समुळे देखील लठ्ठपणा वाढतो. मानवी शरीरात लेप्टिन नामक हार्मोन असते. केव्हा खाल्ले पाहिजे आणि कधी नाही याचे संदेश देण्याचे काम हे हार्मोन करते. जर या हार्मोनच्या कामात काही गडबड झाली तर खाण्यावर नियंत्रण राहत नाही आणि लठ्ठपणा निर्माण होतो.
लठ्ठपणा कसा कंट्रोल कराल
लठ्ठपणा कशामुळे होतो याची कारणे बहुतेकांना माहिती असते. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. खाण्याचे प्रमाण लठ्ठपणाचे सर्वात बेसिक कारण आहे. वेळेनुसार आहार घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. जंक फूड (Junk Food) आणि शारीरिक हालचालींचा अभाव (Physical Activity) लठ्ठपणा वाढण्याची मोठी कारणे आहेत. तसेच तणाव आणि एंगजायटी सुद्धा लठ्ठपणाची मोठी कारणे आहेत. यासाठी आहार आणि लाईफस्टाईलवर थोडे लक्ष देण्याची गरज आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे लठ्ठपणा कंट्रोल करता येऊ शकतो.
धक्कादायक! जगात इतक्या लोकांना बहिरेपणाचा त्रास; भारतातही वाढतोय ‘हा’ आजार