धक्कादायक! जगात इतक्या लोकांना बहिरेपणाचा त्रास; भारतातही वाढतोय ‘हा’ आजार

National Hearing Week : देशभरात 3 ते 10 मार्च दरम्यान राष्ट्रीय श्रवण सप्ताह साजरा (National Hearing Week) केला जातो. लोकांमध्ये जनजागृती करणे हा उद्देश यामागे आहे. कानांच्या समस्या काय आहेत? कानांची काळजी कशी घ्यावी? याबाबत या सप्ताहात माहिती दिली जाते. यासाठी ठिकठिकाणी शिबिरे आयोजित केली जातात. कानांची तपासणी केली जाते. कानांच्या आजारांवर उपचार केले जातात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (World Health Organization) जगभरात 46.6 कोटी लोक बहिरेपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत. यामध्ये 3.4 कोटी लहान मुलांचा समावेश आहे.
भारतात सन 2011 मध्ये जनगणना झाली होती. यामध्ये म्हटले होते की देशात 5.73 दशलक्ष व्यक्तींना ऐकण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर 19.8 दशलक्ष लोकांना बोलण्यात समस्या जाणवत आहेत. 0 ते 6 वयोगटातील मुलांमध्ये 23 टक्के मुलांना ऐकण्याची समस्या जाणवत आहे. 0 ते 19 वयोगटातील 20 टक्के मुलांना स्पष्ट ऐकू येण्यात अडचणी आहेत. आजाराचे वेळीच निदान न झाल्याने बहिरेपणाची समस्या ठीक झालेली नाही.
सावधान! जंक फूडचा मेंदूला गंभीर धोका, ‘या’ समस्या निर्माण होण्याची शक्यता
बहिरेपणाची लक्षणे काय आहेत
कानांचे अनेक प्रकारचे आजार आहेत. साधारणपणे बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे कानाची समस्या उद्भवते. या इन्फेक्शन मुळे कानात खाज सुटणे, वेदना आणि कान जड झाल्याचा त्रास जाणवतो. मुलांना बोलण्यात आणि शिकण्यात अडचणी येत नाहीत तो पर्यंत कानांच्या समस्येकडेही दुर्लक्ष केले जाते किंवा मुलाला अशी काही समस्या आहे हे पालकांच्याही लक्षात येत नाही. त्यामुळे कानाच्या आजाराचे वेळीच निदान होत नाही. परंतु योग्य वेळी योग्य उपचार केले तर कानांची समस्या नियंत्रणात आणता येते. जर मुल योग्य पद्धतीने बोलू शकत नसेल तसेच त्याला ऐकण्यात अडचण येत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवले पाहिजे.