Osmanabad : राजेनिंबाळकर विरुद्ध पाटील : दोन कुटुंबातील सत्तासंघर्ष… कोण मारणार बाजी?

Osmanabad : राजेनिंबाळकर विरुद्ध पाटील : दोन कुटुंबातील सत्तासंघर्ष… कोण मारणार बाजी?

Osmanabad Lok Sabha : धाराशिव जिल्ह्याचं राजकारण म्हंटलं की डोळ्यासमोर येतो तो पाटील विरुद्ध राजेनिंबाळकर या दोन घराण्यांतील संघर्ष. दोन पिढ्यांमध्ये सुरु असलेला हा संघर्ष यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा समोर आला. ओम राजेनिंबाळकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार होते, तर त्यांच्या भावजय म्हणजेच अर्चना पाटील या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. त्यामुळे दोन घराण्यातील संघर्षावरच ही निवडणूक फिरणार असल्याचे स्पष्ट होते. त्याप्रमाणे फिरली देखील. आता या दोघांपैकी मतदारसंघावर, जिल्ह्याच्या राजकारणावर कोणाचा होल्ड राहणार हे येत्या चार जूनलाच स्पष्ट होईल.

पण त्यापूर्वी मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती राहिली, मतदान कसे झाले, राजकीय जाणकार कोणाच्या विजयाचा अंदाज व्यक्त करतात? हे पाहणे महत्वाचे ठरते…

धाराशिव म्हणजेच जुना उस्मानाबाद जिल्हा. हा जिल्हा म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. पण 1995 नंतर इथे शिवसेनेने हातपाय पसरले आणि 1996 ला तरी शिवाजी कांबळेंच्या रुपाने सेनेचा खासदार निवडूनही आला. त्यानंतर इथे काँग्रेसची पीछेहाट होत राहिली. येथे भाजप आणि शिवसेनेसारख्या शहरी पक्षांनी मैदान गाजवलं. सध्या विद्यमान खासदार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तर येथील आमदार भाजपचे अशी स्थिती आहे.

राजकीय आणि कौटुंबीक संघर्ष :

एका बाजूला भाजप आणि शिवसेना हातपाय पसरत असताना एथे काँग्रेसचा एकखांबी तंबू शाबूत ठेवलेला तो डॉ. पद्मसिंह पाटील यांनी. ते इथून आमदार झाले, मंत्री झाले. तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखू जाऊ लागले. पुढे ते राष्ट्रवादीत गेले. तिथेही त्यांनी जम बसविला. खासदार झाले. पण यादरम्यान, घडले राज्यभर गाजलेले पवनराजे निंबाळकर हत्याकांड. सख्ख्या-चुलत भावाच्या हत्येच्या आरोपात पद्मसिंह पाटील तुरुंगात गेले. तिथूनच सुरु झाला दोन कुटुंबातील संघर्ष.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत पवनराजेंचे चिरंजीव ओम राजेनिंबाळकर राजकारणात आला. तर पद्मसिंह पाटलांचा मुलगा राणा जगजितसिंह यांचीही राजकारणात एन्ट्री झाली. दोघे भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकले. यात ओम राजेनिंबाळकरांचा विजय झाला. त्यानंतरच्या काळात ओमराजेंनी जिल्ह्यातील अनेक संस्थांमध्ये स्वतःचं नेटवर्क तयार केलं. 2014 मध्ये पुन्हा हे दोघे समोरासमोर आले. त्यावेळी राणा जगजितसिंहांचा विजय झाला. 2019 मध्ये लोकसभेला पुन्हा दोघांमध्ये लढत झाली. यात ओम राजेनिंबाळकरांचा विजय झाला.

उस्मनाबाद लोकसभेचे समीकरण कसे आहे?

उस्मानाबाद या लोकसभा मतदारसंघात धाराशिव, तुळजापूर, उमरगा, परंडा हे चार विधानसभा मतदारसंघ, तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.

गतवेळी काय होती परिस्थिती?

गत दोन्हीवेळी काँग्रेसचे आमदार असूनही औसा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारांना घसघशीत लीड मिळाले होते. यात 2014 मध्ये रवींद्र गायकवाड यांना 54 हजार आणि 2019 मध्ये ओम राजेनिंबाळकरांना जवळपास 54 हजारांचे लीड मिळाले होते. उमरगा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. ज्ञानराज चौगुले धनुष्यबाणावर तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. गत तिन्ही लोकसभेला शिवसेनेच्याच उमेदावाला लीड मिळाले होते. 2014 मध्ये जवळपास 40 हजार आणि 2019 मध्ये 20 हजारांचे लीड मिळाले होते.

बच्छावांसाठी ‘धुळ्याची’ वाट अवघडच… सुभाष भामरे तिसऱ्यांदा खासदार होणार?

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ओम राजेनिंबाळकर यांनी गतवेळी 22 हजारांचे लीड घेतले होते. त्यापूर्वी रवींंद्र गायकवाड यांनाही 35 हजारांचे लीड मिळाले होते. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून लढाई ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कायमच घासून होत आली आहे. परांड्यामधूनही गत तिन्ही लोकसभेला शिवसेना उमेदवाराला लीड मिळाले होते. बार्शीच्या मतदारांनाही लोकसभेला शिवसेना आणि विधानसभेला राष्ट्रवादी असे समीकरण साधून ठेवले आहे.

यंदा काय आहे परिस्थिती?

यंदा पक्षाच्या फाटफुटीनंतर इथली लढत पुन्हा याच दोन कुटुंबांमध्ये केंद्रीत झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ओम राजेनिंबाळकर हेच उमेदवार असतील हे स्पष्ट होते. तर महायुतीच्या जागा वाटपात धाराशिवची जागा अजितदादांना सुटली. पण त्यांच्याकडे उमेदवार नसल्याने भाजपमधून अर्चना पाटील यांना पक्षात घेतले. अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच राजकीय आणि कौटुंबीक संघर्ष दोन्हीकडून पुढे आला.

यंदा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपची ताकद चांगली आहे. यात शिवसेनेचे दोन, भाजपचे दोन, भाजपचे सहयोगी एक आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे एक असे आमदार आहेत. गतवेळी एवढेच यंदाही मतदारांनी उत्साहाने मतदान केले. राज्याच्या इतर भागात मतदानाचा टक्का घसरत असतानाच धाराशिव जिल्ह्यात मात्र मतदानाचा आकडा चांगला राहिला.

विधानसभा निहाय मतदारसंघाची परिस्थिती आणि आकडेवारी 

यातील औसामधून अभिमन्यू पवार आमदार आहेत. याशिवाय निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचीही इथे चांगली ताकद आहे. सोबतच माजी आमदार बसवराज पाटील हेही आता भाजपसोबतच आले आहेत. या सगळ्याचा फायदा अर्चना पाटील यांना होऊ शकतो. महाविकास आघाडीसाठी औसामध्ये शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने हे सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यांनी ओम राजेनिंबाळकरांना पुन्हा खासदार करण्यासाठी जीवाचे रान केले. औसामधील ओमराजेंची स्वतःती ताकद आणि ठाकरेंची सहानुभूती यामुळे 50-50 होण्याचा अंदाज आहे. औसामध्ये यंदा 60.30 टक्के मतदान झाले आहे.

उमरग्यामध्ये ज्ञानराज चौगुले हे सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. 2014 मध्ये स्वतंत्र लढल्यानंतरही त्यांचा विजय झाला होता. शिवसेनेचा इथला मतदानाचा टक्का हा कायमच 45 ते 50 टक्क्यांच्या पुढे राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद अर्चना पाटील यांच्यासाठी कामाला येऊ शकते. तर ओमराजेंसाठी इथे माजी खासदार रविंद्र गायक वाड यांची आणि काँग्रेसच्या ताकदीची चांगली मदत होईल असा अंदाज आहे. मात्र इथून अर्चना पाटील या पुढे राहतील असे चित्र आहे. उमरग्यामध्ये 60 टक्के मतदान झाले आहे.

परभणीत विजयाचा गुलाल माझाच, ही काळ्या दगडावरची रेष…; महादेन जानकरांचा मोठा दावा

तुळजापूरमध्ये गत दोन्ही लोकसभेला शिवसेनेला मताधिक्य मिळाले आहे. पण यंदा अर्चना पाटील यांना इथून आघाडी मिळेल असे चित्र आहे. याचे कारण इथून त्यांचे पती राणा जगजितसिंह हेच स्वतः आमदार आहेत. शिवाय इथले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचा मुलगा सुनील चव्हाण यांनीही मतदानापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मधुकर चव्हाण यांनीही शरद पवार आणि ओम राजेनिंबाळकर यांच्यापासून अंतर राखले. या घडामोडी अर्चना पाटील यांच्यासाठी बोनस ठरल्या होत्या.

इथे ओम राजेनिंबाळकर यांनी ताकद लावली. इथली राष्ट्रवादीची ताकद लक्षात घेऊन शरद पवार यांनीही जोडणी लावली. पवारांसोबत निष्ठेने राहिलेले अशोक जगदाळे, कारखानदार अरविंद गोरे यांच्या मदतीने शरद पवार यांनी ओमराजेंसाठी मताधिक्य मिळवून देण्यासाठी त्यांनी रणनीती आखली. पण आता तुळजापूरमधून कोण पुढे राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तुळजापूरमध्ये यंदा 65.40 टक्के मतदान झाले आहे.

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात कैलास पाटील हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी ओमराजेंसाठी पायाला अक्षरशः भिंगरी बांधली होती. शिवाय ओम राजेंचेही इथे स्वतःचे मोठे नेटवर्क आहे. 2009 मध्ये पहिल्यांदा ते याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. इथे ओमराजें यांच्यासाठी सहानुभूतीचाही फायदा होऊ शकतो. पण अर्चना पाटील यांच्यासाठी हा जणू घरचा मतदारसंघ आहे. पद्मसिंह पाटील इथून सातवेळा आमदार होते. तर राणाजगजितसिंह हेही 2014 मध्ये आमदार झाले होते. त्यामुळे सालाबादप्रमाणे इथे यंदाही घासून लढाई होण्याचा अंदाज आहे. उस्मानाबादमध्ये 63.97 टक्के मतदान पार पडले.

परांड्यामध्ये मंत्री तानाजी सावंत यांच्या मोठ्या ताकदीचा यंदा अर्चना पाटील यांना फायदा होऊ शकतो. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांची ओम राजेंसाठी मदत होईल असे चित्र आहे. इथे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे. याशिवाय इथे पवार-ठाकरेंच्या सहानुभूतीचीही लाट असल्याचे जाणवून आले. बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे भाजपसोबत आहेत. ते अपक्ष असल्याने त्यांची संपूर्ण ताकद अर्चना पाटील यांच्या मागे उभी राहु शकते. इथे माजी आमदार दिलीप सोपल यांनी ओम राजेनिंबाळकर यांच्यासाठी चांगलाच जोर लावला होता. त्यांनी हॉस्पिटलमधून येत थेट ओम राजेंच्या प्रचारात सहभागी होत एक भावनिक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. परंडामध्ये 63.54 टक्के मतदान झाले आहे.

धाराशिव जिल्ह्याची मागास जिल्हा म्हणून ओळख कायम :

उस्मानाबाद जिल्ह्याने मोठमोठे राजकीय नेते घडवले आहेत, राज्यपातळीवर मातब्बर नेत्यांचे नातलगही या मतदारसंघात आहेत. परंतु, हे सगळं राजकारण मोठ्या जोमानं झालं असलं तरी हा जिल्हा विकास, रोजगार, शिक्षण आणि उद्योगापासून आजही वंचितच राहिला आहे. सततचा दुष्काळ, राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव, सरकारचं उदासीन धोरण, मतदारसंघातील राजकारण आणि उद्योगावर काही मोजक्या घराण्यांचं असलेलं नियंत्रण या कारणांमुळे धाराशिव जिल्हा मागास म्हणून ओळखला गेला. आता यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा हा मुद्दा गाजला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज