मी सुनेत्रा अन् पार्थ पवारांची कर्जदार, शेतीतूनही शून्य उत्पन्न; सुप्रिया सुळेंनी सादर केलं शपथपत्र

  • Written By: Published:
मी सुनेत्रा अन् पार्थ पवारांची कर्जदार, शेतीतूनही शून्य उत्पन्न; सुप्रिया सुळेंनी सादर केलं शपथपत्र

पुणे : बारामती लोकसभेसाठी आज सुप्रिया सुळेंसह अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, आता चर्चा सुरू झाली आहे ती सुप्रिया सुळेंनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत भरलेल्या शपथपत्राची. या शपथपत्रात सुळेंनी त्यांना शेतीतून शून्य उत्पन्न असल्याचे नमुद केले आहे, तर, सुनेत्रा पवार यांचे आपल्यावर 55 लाखांचे कर्ज असल्याचे म्हटले आहे.

…म्हणून मी लढत आहे

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुळेंनी जनतेचे आशीर्वाद, विश्वासाचा जोरावर पुन्हा दिल्लीत जाण्याची संधी मिळेल असा ठाम विश्वास व्यक्त केला. मायबाप जनतेची सेवा, महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगारांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राहावा यासाठी मी लढत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व लढाईत जनतेची साथ माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिल असे सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

सुनेत्रा पवार अजितदादा दगडूशेठ गणपतीला शरण 

सुप्रिया सुळेंसह आज (दि.18) अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी सकाळी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी एकत्रित दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर महायुतीची जाहीर सभा पार पडली. या सभेत सुनेत्रा पवारांनी देशात मोदींच्या कामाची तर, बारामतीत अजित पवरांच्या कामाची चर्चा होते असे सांगितले.

मोदींच्या काळातच विकास झाला

पुढे बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आता वेळ जरी बदललेली असली तरी, आपलं घड्याळ तेच आहे. त्यामुळे घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत आणि मोदींना मत म्हणजे विकासाला मत असं सांगत यावेळी आपण नक्की विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केला. देशभरात विकास होताना आपण पाहिला आहे. आपण बारामतीचा विचार केला तर लक्षात येईल अजितदादांनी किती काम केलं आहे. त्यांनी जर कुठल्या कामाचा ध्यास घेतला तर, ते काम पूर्ण कारायचंच अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे. त्यांच्यात मोठी उर्जा आहे. त्यामुळेच ते न थकता सातत्याने जनतेसाठी काम करत असतात अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी अजित दादांची स्तुती केली.

कुणी काढू नका अजित दादांची कळ…सुनेत्रा पवारांना मिळणार आहे विजयाचे फळ

महायुतीच्या जाहीर सभेत  बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी कवितेच्या माध्यमातून सुत्रेना पवारांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच विरोधकांना धारेवर धरले. ते म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्याकडे फारच चांगले गुण आहेत. तरी तुम्ही म्हणतात बाहेरची आहे सून, सुनेत्रा पवार यांचा निवडून येण्याचा महिना आहे जून, अजित पवार फेडणार आहेत सगळ्यांचे ऋण असे आठवले म्हणाले.  महायुतीचे महाराष्ट्रात आहे बळ, कुणी काढू नका अजित दादांची कळ असा टोला लगावत सुनेत्रा पवारांना मिळणार आहे विजयाचे फळ असा विश्वास आठवलेंनी बोलताना व्यक्त केला.  उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना जेवढ्या जास्त शिव्या देतील तेवढी आमची मते वाढतील असा दावाही आठवलेंनी यावेळी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज