430 कोटींचे कर्ज थकविल्याचा आरोप : अडचणीत आलेल्या अभिजीत पाटलांचे केंद्राकडे बोट

430 कोटींचे कर्ज थकविल्याचा आरोप : अडचणीत आलेल्या अभिजीत पाटलांचे केंद्राकडे बोट

पंढरपूर : राज्य सहकारी बँकेचे 430 कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखविले आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने जी काही अचानक इथेनॉल बंदीचा निर्णय घेतल्यामुळे 3800 रुपयांची साखर 3400 रुपयांवर आली. चारशे रुपयांचा गॅप पडल्यामुळे बँकेला जे काही पैसे जाणार होते ते कमी जाणार आहेत. त्याबाबत आमची बँकेशी चर्चा सुरु आहे, असे स्पष्टीकरण पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले. (Abhijit Patil, chairman of Vitthal Cooperative Sugar Factory, who is in trouble due to default of Rs 430 crore loan of State Cooperative Bank, has pointed the finger at the Central Government.)

या आरोपांंबाबत बोलताना अभिजीत पाटील म्हणाले, अनेकांनी तक्रार अर्ज केली, यावरुन लक्षात येते यामागे कोण आहे. काही जणांच्या सोशल मिडीयावरुनही लक्षात येते. पण जो आरोप होत आहे की कर्ज काढून फसवणूक केली गेली. तर मी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की मी कुठेही कर्ज काढलेले नाही. कर्जावर सबही केलेली नाही. परंतु कर्ज फेडण्याची जबाबदारी निवडून आल्यामुळे आपोआप आमच्या संचालक मंडळावर आली आहे. आम्ही बँकेशी सातत्याने संपर्कात आहोत. गत हंगामामध्ये जी 17-18 सालातील साखर शिल्लक होती ती विकून कर्जात 30 कोटी नऊ लाख रुपये भरले होते. त्यामुळे ते कर्ज कमी झाले आहे. यावर्षी देखील आम्ही बँकेच्या संपर्कात आहोत आणि जे काही टनामागे 300 रुपये भरायचे आहेत, ते भरतो आहे.

मुळात यंदाच्या उसापासून जी काही साखर, मॉलिसेस किंवा इतर उत्पादने झाली त्यातून मिळालेल्या पैशांवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. शेतकरी, तोडणी वाहतूकदार, कामगारांचे पगार यानंतर बँकेला पैसे भरावे याबाबत आमची चर्चा झाली. ही चर्चा सुरु असतानाच बँकेने कारवाईचे पत्र पाठविले आहे. बँकेचे कर्ज आम्ही फेडू या उद्देशानेच सभासदांनी निवडून दिले आहे. परंतु त्यासाठी काही योजना आहेत, ओटीएस आहे यावर चर्चा सुरु आहे. त्यातून मार्गही काढला. 30 कोटी नऊ लाख भरलेही. त्यामुळेच आम्हाला दिलासा मिळाला होता. यावर्षीही आमची हे पैसे भरण्याची तयारी आहे. पण काही दिवसांपूर्वी सरकारने जी काही अचानक इथेनॉल बंदीचा निर्णय घेतला, त्यामुळे 3800 रुपयांची साखर 3400 रुपयांवर आली. चारशे रुपयांचा गॅप पडल्यामुळे बँकेला जे काही पैसे जाणार होते ते कमी जाणार आहेत. त्याबाबत आमची बँकेशी चर्चा सुरु आहे.

सभासदांचे पैसे सुरक्षित :

गतवर्षी जे काही थकीत उसाचे बिल होते, जे मागच्या संचालकांना बुडविले होते ते दिल्यामुळे, गेल्यावर्षी आपण 2500 रुपये दिले होते, तोडणी वाहतूक, उसाचे भाव असे पैसे दिले. यावर्षीही हे सुरु आहे. त्यामुळे कोणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही. प्रामाणिकपणे आपण काम करत आहोत. जे पैसे येतात ते शेतकरी, तोडणी वाहतूकदार आणि बँकेला दिले जातात. यातील एक रुपयाही कुठे गेलेला नाही. सभासदांनी निर्धास्त रहावे. ज्या विश्वासाने निवडून दिले आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, असेही आश्वासन अभिजीत पाटील यांनी दिले.

काय आहेत आरोप?

राज्य सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी कैलास नामदेव घनवट यांनी बँकेचे प्रशासक यांच्या निर्देशांनुसार 430 कोटी रुपयांचे देणे थकविल्याप्रकरणी पाटील यांच्यासह 21 संचालकांविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार नोंदवत या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. या तक्रारीत म्हंटल्याप्रमाणे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला वेळोवेळी केलेल्या मागणी अर्जानुसार बँकेने ऊस गाळप हंगामासाठी आणि वीज निर्मितीसाठी तसेच इतर जोड उत्पादनांसाठी कर्जमर्यादा मंजूर करुन उच दिलेली आहे. मात्र कर्ज म्हणून घेतलेली रक्कम आणि त्यातून झालेल्या उत्पादनांची रक्कम बँकेत जमा न करता स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी या सर्व संचालकांनी वापरली आहे.

कारखान्याने साखरेची, विजेची आणि इतर उत्पादनांची परस्पर विक्री केली आहे. कारखान्याने आणि त्यांच्या संचालकांनी 31 डिसेंबर 2023 अखेर 252.49 कोटी कर्ज आणि 177.68 कोटी इतके व्याज बँकेला भरलेले नाही, ही कृती बँकेची फसवणूक करणारी आहे, असे आरोप करत बँकेचे प्राधिकृत अधिकारी घनवट यांनी भारतीय दंड विधान 1860 मधील कलम 406, 420, 421, 422, 423, 424 व कलम 34 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी शिफारस पंढरपूर ग्रामीण पोलिसांना केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube