मोठी बातमी! पाऊस थांबताच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई? कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं मोठं विधान
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचे विधान केले. पाऊस थांबताच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Minister Dattatreya Bharane Compensation To farmers : गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप पिके पाण्यात वाहून गेली, शेतकऱ्यांचे डोळ्यासमोर श्रम वाया गेले आणि बळीराजा हतबल झाला. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. पाऊस थांबताच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू झालेल्या शिवारफेरीच्या उद्घाटनावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. भरणे (Agriculture Minister Dattatreya Bharane) म्हणाले, जून-जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या (Farmer Loss) खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही पंचनाम्यानंतर लवकरच (Heavy Rain) मदत मिळेल.
युरियाच्या तुटवड्याबाबत केंद्राशी चर्चा
सध्या राज्यातील काही भागात युरियाची टंचाई जाणवत असल्याचे मान्य करत कृषिमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारशी यासंदर्भात बोलणी सुरू असून लवकरच शेतकऱ्यांना याबाबत आनंदाची बातमी मिळेल.
अतिवृष्टीमुळे व्यापक नुकसान
सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांसह राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. खरीप पिकांचा मोठ्या प्रमाणावर बळी गेला आहे. शेतकऱ्यांची पिकं चिखलात परिवर्तित झाली असून संपूर्ण परिश्रम वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. विरोधकांनी नुकसान भरपाई आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे, तर सरकारवर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा दबाव वाढत आहे.
शिवारफेरीत पिकांच्या विविधता आणि तंत्रज्ञानाचं प्रदर्शन
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू झालेली ही शिवारफेरी तीन दिवस चालणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील 11 जिल्ह्यांतील शेतकरी आणि नागरिक या फेरीत सहभागी होणार आहेत. यंदाचं हे 43वं वर्ष असून 20 एकर क्षेत्रावर पिकांचे थेट प्रात्यक्षिक दाखवले जात आहेत.
– 112 खरीप पिके
– 27 भाजीपाला पिके
– 59 फुलवर्गीय पिके
असं एकूण 212 पिकवाण आणि तंत्रज्ञान यंदा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे.
कृषी विद्यापीठातील रिक्त पदांवर निर्णय लवकरच
कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले की, राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्याबाबत सरकार पुढील एका-दोन महिन्यांत ठोस निर्णय घेईल. अकोला विद्यापीठातील रिक्त पदांवरून निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीबाबतही त्यांनी भाष्य केलं.
पिकसंरक्षणासाठी नवी योजना
कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या वेळी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या पिकांचे जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी बांबूंच्या कुंपणाची योजना सरकार लवकरच राबवणार आहे. दरम्यान, बच्चू कडू आणि रविकांत तुपकरांनी केलेल्या विधानांबद्दल विचारलं असता जयस्वाल यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.