अंजली दमानियांचा पुढचा प्लॅन ठरला; धनंजय मुंडेंचं मंत्रिपद घालवलं आता आमदारकीही घालवणार…

Ajanli Damania on Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. (Munde ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा मागवून घेतला होता. त्यानंतर स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्या मार्फत मुंडे यांनी राजीनामा पाठवून दिला. या राजीनाम्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता तर मी आणखी गोष्टी खोदून काढणार असल्याचा इशारा दिला आहे.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, मी स्वीकारला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दमानिया म्हणाल्या, राजीनामा दोन महिन्यांपूर्वीच घ्यायला हवा होता. पण आता मी गोष्टी खोदून खोदून काढणार आहे. खंडणीची बैठक धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी झाली होती. तिथले आता टॉवर लोकेशन काढून मी आता हा विषय पुढे नेणार आहे, असे दमानिया यांनी सांगितले.
दमानिया यांना अश्रू अनावर
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, या हत्याकांडाचे फोटो पाहून मी झोपू शकले नाही. मला रात्री अडीच वाजता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा मेसेज आला होता. ते मला म्हणाले, ताई आता मला हे बघवत नाही. मी आता काहीतरी निर्णय घेणार आहे.
सकाळी मी सात वाजता त्यांना फोन केला आणि विनंती केली की असं काहीही करू नका. आतापर्यंत तुम्ही खूप शांत राहिला आहात. खूप संयमाने हे सगळं प्रकरण हाताळल आहे. आताही शांत राहा. तुमच्यावरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. तुमची व तुमच्या भावाची मुले आता तुमच्यावरच अवलंबून आहेत, ही सर्व हकीकत सांगताना दमानिया यांना अश्रू अनावर झाले.