चंद्रपूर ठरलं जगातील सर्वात उष्ण शहर; काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
सोमवारी तर विदर्भ जगातील उष्ण प्रदेशांच्या यादीत आला. चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. यंदा एप्रिल महिना (Maharashtra Weather) जास्त उष्ण ठरेल असा अंदाज आधीच व्यक्त करण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. या महिन्यात उष्णता प्रचंड वाढली आहे. देशातील सर्वाधिक उष्ण प्रदेशांत महाराष्ट्रातील विदर्भाचा समावेश झाला आहे. सोमवारी तर विदर्भ जगातील उष्ण प्रदेशांच्या यादीत आला. चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.
एल्डोराडो या वेबसाइटवर दररोज जगातील सर्वात उष्ण आणि थंड शहरांची यादी जाहीर केली जाते. यात सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत 15 पैकी तब्बल 11 शहरे भारतातील होती. यातही विदर्भातील तीन शहरांचा समावेश होता. यातील चंद्रपूर शहरात (Chandrapur Temperature) सर्वाधिक म्हणजे 45.6 अंश तापमानाची नोंद घेण्यात आली.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यावर सूर्य तापणार, विदर्भात अवकाळीचं संकट; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
देशात उन्हाळा प्रचंड वाढला आहे. चंद्रपूरनंतर झारसुगडा या शहराचे नाव आहे. येथे 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला 44.1 तापमानासह जगातील नवव्या क्रमांकाचे सर्वात उष्ण शहर ठरले. नागपूर 43.6 अंश सेल्सिअस तापमानासह जगात चौदाव्या क्रमांकावर राहिले. इतकेच नाही तर सध्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तापमान 40 अंशांच्या पुढे राहत आहे.
यलो अलर्ट जारी
विदर्भातील चंद्रपुरात सोमवारी प्रचंड उष्णता होती. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. विदर्भात सर्वच ठिकाणी वाढते तापमान पाहता येथे उष्णतेची लाट घोषित करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत हवामान कोरडे राहील. अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर येथे उष्णतेची लहर घोषित करण्यात आली आहे. या जिल्ह्यांना प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे उष्णतेत बाहेर पडताना नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील जनता सध्या हवामानातील चढ उताराचा अनुभव घेत आहे. मार्च महिन्यात रणरणतं ऊन होतं. पण शेवटच्या आठवड्यात हवामानात मोठा बदल झाला. सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला पण शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यानंतर एप्रिल महिन्यात तापमानात वाढ होईल असा इशारा हवामान खात्याने दिला होता. हा अंदाजही खरा ठरला. या महिन्यात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे.
सावधान! तुमच्या ‘या’ सवयींमुळे लिव्हरचे होतेय नुकसान; खास टिप्स फॉलो करा अन् राहा फिट..