ट्रॅपमध्ये अडकलेल्या बदमाश आमदारांना बाहेर काढणार; नाना पटोले प्रचंड संतापले
Nana Patole on Maharashtra MLC Election Result : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाची आठ मतं फुटल्याने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटील यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. तरीदेखील त्यांना काँग्रेसची मदत झाली नाही. या प्रकारामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली असून या फुटलेल्या आमदारांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole) थेट बदमाश म्हणून संबोधलं. या बदमाश आमदारांना थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. त्यांच्यावर अशी कारवाई करू की पुन्हा असा प्रकार करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही असे नाना पटोले म्हणाले.
विधानपरिषद निवडणूक निकालानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, विजयी उमेदवार प्रज्ञा सातव आदी उपस्थित होते. निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्याने नाना पटोले यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
पटोले म्हणाले, मागील वेळच्या विधानपरिषद निवडणुकीत आम्ही ट्रॅप लावला होता पण त्यावेळी ही बदमाश मंडळी सापडली नव्हती. आताही आम्ही ट्रॅप लावला होता. या ट्रॅपमध्ये ही बदमाश लोकं सापडलेली आहेत. वरिष्ठांना याबाबत कळवण्यात आलं आहे. ज्यांनी पक्षाशी बेईमानी केली गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आताच हायकमांडला आम्ही रिपोर्ट सादर केला आहे.
चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले त्यावेळी काही लोकांनी विश्वासघात केला होता. त्यांच्यासाठी या निवडणुकीत आम्ही ट्रॅप लावला होता. मी ही गोष्ट नाकारत नाही. जे कोण बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आलेत. आता अशा विश्वासघाती आणि गद्दार लोकांना पक्षातून बाहेर काढण्यात येईल. त्यांच्यावर अशी कारवाई केली जाईल की पुन्हा असा प्रकार करण्याची हिंमत कुणी करणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
कोणती मतं फुटली, काँग्रेस काय कारवाई करणार ?
या निवडणुकीत काँग्रेसची आठ मतं फुटल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हे कोण आमदार आहेत याची माहिती मात्र समोर आलेली नाहीत. काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावरून मात्र त्यांना कोणते आमदार फुटले याचा अंदाज आल्याचं दिसत आहे. आता या फुटीर आमदारांवर काँग्रेस काय कारवाई करणार, या प्रकारामुळे महाविकास आघाडीतील विश्वास कमी होणार का, या प्रश्नांची उत्तर काय असतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
MLC Election : मातोश्रीपासून विधानभवनापर्यंत ठाकरेंचे राईट हॅन्ड नार्वेकरांनी बाजी मारली