जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, ते मुंबई आणि राज्य काय सांभाळणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आगपाखड
युतीच्या घोषणेवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोंडसुख घेत, ही युती खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी असल्याच वक्तव्य
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Raj and Uddhav Thackeray : राज्यभरात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेले असतानाच उद्धव ठाकरे यांची शिवसेना(Shivsena) आणि मनसेने(MNS) युतीची घोषणा केली आहे. मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी महापालिका निवडणूका एकत्र लढवणार असल्याचं जाहीर केलं. या पत्रकार परिषदेत जागावाटपाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दोन्ही पक्षांकडून युतीची घोषणा केल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. युतीच्या घोषणेवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(DCM Eknath Shinde) यांनी तोंडसुख घेत, ही युती खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी असल्याच म्हटलं आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आम्ही युती म्हणून विजयी झालो आहोत. नगरपरिषदांमध्ये महाविकास आघाडीच्या एकूण नगराध्यक्षांच्या जितक्या जागा आल्या त्यापेक्षा एकट्या शिवसेनेच्या जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे अशा युत्या या सत्तेसाठी आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आहेत. काही लोकं मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहत आहेत. आधी अंडी खातं होते, आता कोंबडीच कापायला आले असतील, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला आहे.
प्रशांत जगतापांचा राजीनामा अन् अजितदादांशी युती; सुप्रिया सुळेंनी दिली A टू Z माहिती
युतीच्या पत्रकार परिषदेदरम्यान जागावाटपाबाबत विचारलं असता राज्यात पोरं पळवणारी टोळी सक्रिय असल्याचं विधान राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, ते मुंबई आणि राज्य काय सांभाळणार, असा टोला राज ठाकरे यांना लगावला आहे.
त्याचप्रमाणे मराठीच्या मुद्द्यावर मतदारांना साद घालणाऱ्या उद्धव ठाकरेंवरही यावेळी त्यांनी टीका केली. यावेळी ते म्हणाले की, मराठी माणूस आता आठवला? मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला. मराठी माणसाचं खच्चीकरण झालं, तेव्हा मराठी माणूस आठवला नाही. जेव्हा निवडणूक येतात तेव्हा बोर्ड लागतात की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. तुम्ही एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं का? आम्ही साडेबारा हजार लोकांना घरं दिली. पुढे 1 लाख गिरणी कामगारांना आमच्याकडून घरं दिली जाणार आहेत. 35 ते 40 लाख लोकांना टप्प्याटप्प्याने क्लस्टर योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमच्याकडे योजना आहे का? इतके वर्ष सत्ता गाजवली, मुंबईकरांसाठी काय केलं. बाकी मुंबईकर सुज्ञ आहेत, यंदाच्या निवडणुकीत त्यांना विकास हवा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले
