“उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो काँग्रेसची साथ सोडा, पण त्यांनी ऐकलं नाही”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे शिवसेनेतून (Eknath Shinde) बाहेर पडले आणि भाजपशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री बनले. या गोष्टी आता इतिहास झाल्या आहेत. मात्र राजकारणात आजही हाच मुद्दा चर्चेत आहे. आता तर निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठी (Uddhav Thackeray) शिंदे गटाचे नेते या गोष्टी पुन्हा राजकीय पटलावर आणत आहेत. माजी मंत्री रामदास कदम यांनी (Ramdas Kadam) अशाच एका प्रस्तावाचा उल्लेख केला आहे ज्याची चर्चा आता सुरू झाली आहे. रामदास कदम यांनी आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे दोन्ही शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात Uddhav Thackeray यांची तोफ धडाडणार ! नवा वार कोणता करणार ?
शु्क्रवारी दापोलीत आयोजित कार्यक्रमात कदम बोलत होते. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मी उद्धव ठाकरेंसमोर एक प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांनी शरद पवारांचं ऐकलं आणि काँग्रेसबरोबर राहिले. गद्दारीची व्याख्या काय आहे हे अजून बऱ्याच जणांना कळलेलं नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटीला गेले होते त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. मी खोटं बोलत नाही. त्याचवेळी मी त्यांना म्हणालो होतो की तुम्ही काँग्रेसची साथ सोडा दोन तासांत मी सगळे आमदार परत आणतो. पण उद्धव ठाकरेंनी माझं ऐकलं नाही. मी शिवसेना का सोडली यासाठी आता मी लवकरच एक पुस्तक लिहीणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीवरही (Maharashtra Elections 2024) त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांचा भाजपबाबतचा सूर काहीसा मावळल्याचे दिसले. कदम म्हणाले, आम्हाला महायुती टिकवायची आहे. सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. जो चुकला त्यालाही सोबत घ्यायचं आहे. आमचं एकच ध्येय आहे ते म्हणजे आम्हाला बाळासाहेबांना अपेक्षित असलेला विकास करायचा आहे. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी भाजपवर घणाघाती टीका केली होती. परंतु, निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांचा भाजपबाबतचा सूर (BJP) आता मवाळ झाल्याचे दिसत आहे.
जेवढ्या जागा तुम्ही घ्याल तेवढ्याच आम्हाला द्या; रामदास कदमांची जागा वाटपाबाबत जाहीर भूमिका