पटेलांचा राजीनामा, साताऱ्याला मिळणार आणखी एक खासदार; राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर

पटेलांचा राजीनामा, साताऱ्याला मिळणार आणखी एक खासदार; राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यानुसार, 25 जूनला मतदान आणि मतमोजणीही होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. पटेलांच्या जागी महायुतीकडून राष्ट्रवादीचा उमेदवार असणार हे स्पष्ट आहे. आता या जागेवर राष्ट्रवादी कोणाची वर्णी लावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, सहा जून रोजी या निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. तर 13 जून रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 18 जून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. आवश्यकता असेल तर 25 जूनला मतदान होईल आणि त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. मात्र महायुतीकडे बहुमत असल्याने ही जागा बिनविरोध राष्ट्रवादीच्या पारड्यात पडण्याची चिन्हे आहेत. (Election Commission of india has announced by-elections for one Rajya Sabha seat in Maharashtra.)

‘अब की बार 400 पार’ घोषणेमुळे दमछाक झाली; पंतप्रधानांचा दाखला देत भुजबळ थेटच बोलले

खासदार प्रफुल्ल पटेल हेच 2022 मध्ये या जागेवरुन निवडून गेले होते. या जागेची मुदत 4 जुलै 2028 रोजी संपणार होती. मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील तांत्रिक लढाईत खासदारकीवर गंडांतर येऊ नये म्हणून त्यांनी मध्येच राजीनामा दिला. त्यानंतर जाहीर झालेल्या राज्यसभेच्या अन्य जागेसाठी उमेदवारी अर्ज भरला. नव्या जागेवर ते निवडूनही आले आहेत. आता याच जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.

साताऱ्याला मिळणार खासदारकी :

लोकसभा निवडणुकीचे जागा वाटप सुरु असताना साताऱ्याची जागा अजित पवार यांनी मागितली होती. मात्र भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी इथून लढण्याचा हट्ट धरला. त्यामुळे अजित पवार यांना ही जागा भाजपला सोडावी लागली होती. त्याबदल्यात अजित पवार यांनी रिक्त होणारी जागा साताऱ्याला देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सातारला आता आणखी एक खासदार मिळणार आहे.

सुजय विखे बाजी मारणार पण लीड घटणार…, राम शिंदे असं का म्हणाले?

 राष्ट्रवादीला मिळू शकतात आणखी दोन जागा :

दरम्यान, साताऱ्याच्या जागेवरुन छत्रपती उदयनराजे भोसले निवडून आल्यास त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होणार आहे. ही जागाही राष्ट्रवादीलाच मिळणार असल्याचे समजते. तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जिंकल्यास रिक्त होणारी राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे पटेल यांनी आधीच जाहीर केले आहे. तर उदयनराजे भोसले यांचा पराभव झाल्यास साताऱ्याला एकाचवेळी तीन खासदार मिळण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube