दोन गटातील हिंसाचारानंतर तणावाची परिस्थिती; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरकडे रवाना

Nagpur Violence : नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री हिंसा उसळल्यानंतर वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते. त्यानंतर दोन गटांकडून एकमेकांवर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. सध्या नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले असून महाल परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. (Nagpur Violence) काल रात्रभर पोलिसांचे अटकसत्र सुरु होते. याशिवाय, सायबर पोलिसांकडून जवळपास 1800 सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात आली आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि 55 व्हिडीओ पोलिसांच्या रडारवर आहेत.
नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, 80 जणांना अटक, या भागात भागांमध्ये संचारबंदी लागू
नागपूरच्या महाल परिसरानंतर हंसपुरी भागातही तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे. या भागात 20 ते 22 वाहनांची तोडफोड करण्यात आली. मात्र, पोलिसांनी येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे. महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज सकाळी10 वाजता नागपूर दौरा करणार असून, ते महाल भागातील पाहणी करणार आहेत. प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद करतील. मीडियाशी संवाद साधतील, अशी माहिती आहे.
नागपूरमधील कोणत्या भागांमध्ये संचारबंदी?
गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सकरदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपीलनगर या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याठिकाणी वैद्यकीय कारण वगळून इतर कारणासाठी कोणीही घराबाहेर पडणार नाही. तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार, सोमवारी नागपूरमधील गणेशपेठ आणि महाल परिसरात सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी औरंगजेबाचा फोटो आणि त्यामध्ये हिरव्या रंगाच्या कापडातील (गवताचा पेंडा भरुन) प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. संध्याकाळी 7.30 वाजता गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालदारपुरा येथे 80 ते 100 लोकांनी जमून पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यामध्ये त्याचा हात जायबंदी झाली आहे.