अहिल्यानगरला अतिवृष्टीचा फटका! 1 लाख 40 हजार शेतकऱ्यांचे नुकसान, फक्त तीनच दिवसांत…
13, 14 आणि 15 सप्टेंबर या तीन दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात आले आहेत.

Heavy Rain In Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. 13, 14 आणि 15 सप्टेंबर या तीन दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात आले आहेत. जिल्ह्यातील अंदाजे एक लाख वीस हजार हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले. यामध्ये एक लाख 40 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाजरी, कापूस, सोयाबीन यांसह नदीकाठच्या फळबागांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
शेती पिकांची पंचनाम्याची प्रक्रिया
पालकमंत्री (Ahilyanagar) राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी पंकज आशीया यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसान झालेल्या शेती पिकांची (Heavy Rain) पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंचनाम्याद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान काढून योग्य मदतीसाठी शिफारसी (Farmers Loss) तयार केल्या जातील. कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना सतत संपर्कात राहून त्यांची मदत करत आहेत.
अतिवृष्टीचा फटका
अहिल्यानगरचे कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्तीच्या काळात कृषी विभाग शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्वरित काम करत असून, नुकसानग्रस्त पिकांना पुन्हा उभारणी करण्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील. यासाठी क्षेत्रीय कृषी कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले असून, शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याच्या तंत्रांची माहिती दिली जाईल.
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम
बाजरी, कापूस, सोयाबीन यांसह विविध पिकांमध्ये झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कृषी विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, पंचनाम्याच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होईल. सुधाकर बोराळे यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे की, अतिवृष्टीमुळे झालेला फटका जरी मोठा असला तरी योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणातून पिकांना पुन्हा उभारणी करता येईल. यासाठी स्थानिक पातळीवरील कृषी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना जमिनीची तयारी, बियाण्याची योग्य निवड आणि पिकांचे संवर्धन यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करणे सुरू केले आहे.
या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे, परंतु कृषी विभागाच्या त्वरित हस्तक्षेपामुळे नुकसानभरपाई आणि पुढील पिकांसाठी प्रशिक्षण उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात आशा निर्माण झाली आहे.