रोहित पवारांच्या दाव्याला हिंदुरावांचा दुजोरा; शेवटच्या क्षणी का घेतला विमान प्रवासाचा निर्णय?
अपघाताबाबत दावे-प्रतिदावे समोर येत असताना या प्रकरणाला एक नवा कलाटणी देणारा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी केला आहे.
Hindurao confirms Rohit Pawar’s claim : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्या विमान प्रवास आणि अपघाताबाबत नवे दावे-प्रतिदावे समोर येत असताना या प्रकरणाला आणखी एक नवा कलाटणी देणारा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी केला आहे. अजित पवार यांनी त्या दिवशी मुळतः विमानाने नव्हे तर रस्त्याने प्रवास करण्याचे ठरवले होते. मात्र शेवटच्या क्षणी आलेल्या एका महत्वाच्या फोनमुळे त्यांचा निर्णय बदलला, असा दावा हिंदुराव यांनी केला आहे.
याआधी आमदार रोहित पवार यांनीही या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. विमान कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी अजित पवार यांच्या प्रवासातील अचानक झालेल्या बदलाकडे लक्ष वेधले होते. अजित पवार गाडीने जाणार होते; परंतु एका नेत्याच्या भेटीमुळे आणि त्यानंतर झालेल्या उशिरामुळे त्यांनी विमान प्रवासाचा पर्याय स्वीकारला, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाला आता प्रमोद हिंदुराव यांनीही दुजोरा दिला आहे.
हिंदुराव यांच्या मते, मंत्रालयातील एका महत्त्वाच्या फाईलसंदर्भात प्रफुल पटेल यांचा फोन अजित पवार यांना आला. त्या फाईलवरील सही अत्यावश्यक असल्याने अजित पवार यांनी सचिवाला ती तातडीने आणण्यास सांगितले. मी आठवडाभर उपलब्ध नसणार आहे, त्यामुळे फाईल लगेच आणा, असे त्यांनी सांगितल्याचे हिंदुराव यांनी स्पष्ट केले. मात्र ती फाईल येईपर्यंत सायंकाळचे साडेसात-आठ वाजले आणि नियोजित वेळेचा उशीर झाला. याच उशिरामुळे बाय रोड जाण्याचा निर्णय रद्द करून त्यांनी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला, असा दावा करण्यात आला आहे.
जलद नफ्याच्या अमिषामागे फसवणुकीचा डाव? अजित पवारांच्या नावाचा वापर करून नवा स्कॅम
विशेष म्हणजे, प्रवासासाठी लागणाऱ्या बॅगा आधीच गाडीत ठेवण्यात आल्या होत्या. सर्व तयारी रस्त्याने जाण्याचीच होती. पण फाईलवरील सहीचा प्रश्न निर्माण झाल्याने आणि वेळ निघून गेल्याने त्यांनी अचानक निर्णय बदलला. गाडीत ठेवलेल्या बॅगा परत काढण्यात आल्या आणि विमान प्रवासाची तयारी करण्यात आली, असे हिंदुराव यांनी सांगितले.
या कथनात आणखी एक भावनिक आणि धक्कादायक तपशीलही त्यांनी मांडला. अजित पवार यांचा अंगरक्षक सहसा विमानात त्यांच्या शेजारी बसत नसे; मात्र त्या दिवशी तो पहिल्यांदाच त्यांच्या बाजूला बसला होता. त्या क्षणाचा फोटो त्याने आपल्या कुटुंबीयांना पाठवला होता. दुर्दैवाने तोच फोटो त्यांच्या आयुष्यातील अखेरचा ठरला, असे हिंदुराव यांनी सांगताना वातावरण गंभीर झाले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे अपघाताच्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. प्रवासाचा निर्णय नेमका कशामुळे आणि कसा बदलला, याबाबत राजकीय स्तरावर वेगवेगळे मतप्रवाह समोर येत आहेत. अधिकृत चौकशी अहवाल आणि संबंधित यंत्रणांचे निष्कर्ष समोर आल्यानंतरच या दाव्यांची सत्यता स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत मात्र या गौप्यस्फोटांमुळे राजकीय चर्चांना नवे परिमाण मिळाले आहे.
