पक्षप्रवेश अन् लगेत हातात बंदूक लायसन; बीडमध्ये तब्बल 355 जणांकडं बंदुका, राजकीय पुढाऱ्यांकडून खैरात

Gun license in Beed : राजकीय पुढाऱ्यांचा आशीर्वाद असल्याने या गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याचे चित्र बीड जिल्ह्यामध्ये दिसत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारी चांगलीच चर्चेत आली. (Beed) अशातच आता बीडमध्ये गरज नसताना ३५५ जणांकडे बंदूका असल्याचे समोर आले आहे. तसेच गुन्हे नोंद असलेल्या ३५५ जणांचे शस्त्र परवाने बीडला निलंबित केल्याचेही समोर आले आहे.
शस्त्र परवाना मिळून देतो म्हणत बीड जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी युवकांची फौज गोळा करून १२८१ शस्त्र परवाने गोळ्या-बिस्किटांसारखे वाटले. ८ महिन्यांपूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि हवेत गोळीबार करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने हे प्रकरण समोर आले. त्यानंतर गुन्हे दाखल असलेल्या ३५५ विभागीय शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.
यातील १७५ जणांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. तरी त्यांचे परवाने रद्द, निलंबित करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी पक्ष प्रवेश करण्याच्या अटीवर अनेकांना शस्त्र परवाने मिळवून दिलेले आहेत गरज नसणाऱ्यांकडेही शस्त्र परवाना आल्याने अनेक जण शस्त्राचा धाक दाखवत अवैध काम करत होते. यामध्ये वाळूमाफिया, मटका, गुटखा विक्रेत्यांकडेही परवाने होते.
बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक घटना; महिला सरपंचाला अश्लील भाषेत शिवीगाळ
मागील आठ महिन्यांत पोलिस प्रशासनाने गुन्हे दाखल असलेल्या परवानाधारकांचे शस्त्र जप्त करून त्यांचे परवाने रद्द, निलंबित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलेले आहे. त्यांच्या पत्रावरून आतापर्यंत बीड जिल्ह्यातील ३५५ जणांचे शस्त्र परवाने निलंबित, रद्द करण्यात आलेले आहेत. बीड जिल्ह्यात २५ ते ३० वयोगटातील अनेकांकडे शस्त्र परवाने आहेत. यातील अनेकांनी केवळ हौस म्हणून परवाने घेतलेले आहेत, तर काही जण दहशत निर्माण करण्याच्या हेतूने कंबरेला बंदूक लावून फिरत आहेत.
सध्या खुलेआम शस्त्र घेऊन फिरणाऱ्यांवर बीड पोलिसांनी चांगला धाक निर्माण केला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात शस्त्र परवाने रद्द केले जात आहेत, तर दुसरीकडे नवीन परवाना मागणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तब्बल ३४२ जणांनी शस्त्र परवाना हवा आहे म्हणून अर्ज केले होते. मात्र यातील २ शस्त्र परवाने वाटप करण्यात आले. तेही बैंकसंदर्भात आहेत. इतर ३४० जणांचे अर्ज फेटाळून लावण्यात आले.