स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार; जरांगे पाटील म्हणाले त्याबाबत समाज….

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार; जरांगे पाटील म्हणाले त्याबाबत समाज….

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण विषयावर मनोज जरांगे पाटील (Patil) यांनी तापवलेल्या वातावरणामुळे लोकसभेला महायुतीला मोठा फटका बसला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा लढा जरांगे पाटील यांनी सुरू केला आहे. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते काय भूमिका घेणार याकडं लक्ष लागलेलं असतानाच जरांगे पाटील यांनीच भूमिका स्पष्ट केली आहे.

मराठा आरक्षणासाठी जो आंदोलनाचा लढा आम्ही उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून आजचा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद आहे. आरक्षणाच्या लढ्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईला येणार आहेत असं ते म्हणाले. आज मनोज जरांगे पाटील हे भोर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रायरेश्वर किल्ल्याला भेट दिली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

कुणबी प्रमाणपत्र अडवण्यावरून जरांगे पाटील भडकले; मंत्री शिरसाटांवर केला गंभीर आरोप

मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे त्याच्याशिवाय दुसरा आरक्षण आम्ही घेणार नाही. 29 ऑगस्टला चलो मुंबईच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका असणार? याबाबत विचारला असता जरांगे पाटील म्हणाले, स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीतला निर्णय समाज घेईल. मी, याबाबत भूमिका घेण्याचा अक्रस्ताळेपणा करणार नाही. समाजाला जो निर्णय वाटेल तो समाज घेईल फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत.

जरांगे पाटील पुढे म्हणाले, सगळ्या भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. ज्ञानेश्वरी मुंडे राखी बांधण्यासाठी येत आहेत. हे मला सकाळी समजलं मी त्यासाठी आता अहिल्यानगरला निघालो असल्याचे जरांगे यांनी सांगितलं. महादेव मुंडे हत्या प्रकरणात ताईंनी ज्या तीन मागण्या आपल्याकडे केल्या होत्या, त्यातील एक मागणी म्हणजे त्यांना आपलं गाऱ्हाणं मुख्यमंत्र्यांकडे मागायचं होतं. तर दुसरी मागणी त्यांची अशी होती की या प्रकरणांमध्ये एसआयटी स्थापन व्हावी.

त्याचबरोबर पंकज कुमावत हे पोलीस अधिकारी तपासासाठी हवे या मागण्या त्यांच्या होत्या आपण सहा दिवसाच्या आत त्यांची तिन्ही मागण्या पूर्ण करून दिल्या आता आरोपींना पकडणं हे आपलं काम नसून ते पोलिसांचा असल्याचं जरांगे म्हणाले. आपल्यात जातिवादाचे रक्त नाही, आम्ही तसे वागत नाही. जातीच्या पलीकडे जाऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांनी हाक दिली आम्ही तिला न्याय द्यायचे 100 टक्के काम केले, असं जरांगे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube