दहा पक्ष बदलणारा मला भाजपमध्ये जाण्याचा सल्ला देतोय; जयंत पाटील यांचे सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर
महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्यातील वादाने आता चांगलाच ताप घेतला आहे.
Jayant Patil’s reply to Sadabhau Khot : राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची धार तीव्र होत असतानाच सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महायुतीतील नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष रंगला आहे. महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्यातील वादाने आता चांगलाच ताप घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यातील एका जाहीर सभेत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता खोचक टीका केली होती. ‘आता काटा उलटा फिरायला लागलाय. फार दिवस ते तिकडे बसणार नाहीत. थोड्याच काळात ते भाजपमध्ये जातील’, असे विधान सदाभाऊ खोत यांनी केले होते. तसेच जयंत पाटील यांना भाजपमध्ये घ्यायचे की, नाही याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी परिस्थितीनुसार घ्यावा, असेही ते म्हणाले होते. या वक्तव्यामुळे जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
Narendra Modi : मोदींच्या भाषणाशिवाय लोकसभेत आभार प्रस्ताव मंजूर; 24 वर्षांपूर्वीही असचं घडलं होतं…
या टीकेला आज जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले. ‘दहा वेळा पक्ष बदलून गेलेला हा बाबा आज मला भाजपमध्ये जाण्याचा सल्ला देतो आहे. मात्र भाजपलाही नीट माहिती आहे की, हा माणूस कोणाचाच नाही,’अशा शब्दांत त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या विश्वासार्हतेवर प्रशचिन्ह उपस्थित केले. जयंत पाटील पुढे म्हणाले, ‘काही लोकांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी माझ्यावर टीका करावी लागते. जयंत पाटील यांच्यावर बोलल्याशिवाय बातमी होत नाही, हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे तथ्य नसलेली विधाने करणे हा त्यांचा रोजचा कार्यक्रम झाला आहे.’
‘ज्यांनी स्वतः आयुष्यात दहा वेळा पक्ष बदलले, त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. अशा नेत्यांना कोणताही पक्ष गांभीर्याने घेत नाही, कारण त्यांची राजकीय भूमिका सतत बदलत असते. भाजपलाही त्यांच्या या स्वभावाची पूर्ण कल्पना आहे,’ असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
दरम्यान, राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू असून शनिवारी मतदान, तर रविवारी निकाल जाहीर होणार आहेत. सांगली जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढती दिसून येत असून, या पार्श्वभूमीवर सुरू असलेला हा कलगीतुरा राजकीय वातावरण अधिकच तापवणारा ठरत आहे.
