दिल्ली सोडू नका! खर्गेंच्या घरी महत्त्वाची बैठक; काँग्रेस अन् ठाकरे गटातील तणावावर तोडगा निघणार?
Maharashtra Assembly Election 2024 : जागावाटपावरुन काँग्रेस, ठाकरेसेनेत वाद झाल्यानं (Election) महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. आता दिल्लीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक सुरु झालेली आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या भवितव्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरु आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जागावाटपावरुन झालेले मतभेद बैठकीच्या केंद्रस्थानी आहेत. विदर्भातील ४ जागांवरुन काँग्रेस, ठाकरेसेनेत मतभेद आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी खरगे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीतील निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
जागा वाटपात पटोले-ठाकरे आमने सामने; विदर्भातील हा मतदारसंघ ठरला वादाचं मुख्य कारण
काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीची बैठक २ दिवसांपूर्वीच संपन्न झाली. या बैठकीत पहिल्या यादीतील उमेदवार निश्चित झाले. त्यांच्या नावांवर केंद्रीय निवडणूक कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार होतं. ती बैठक आज होणार होती. पण ठाकरेसेनेत झालेल्या वादानंतर ती बैठक रद्द करण्यात आली. ही बैठक उद्या संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. त्यामुळे दिल्ली सोडून जाऊ नका, असे आदेश काँग्रेस नेतृत्त्वाकडून राज्यातील नेत्यांना देण्यात आलेले आहेत.
काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आजच जाहीर केली जाणार होती. परंतु, ठाकरे सेनेसोबत झालेल्या मतभेदांमुळे काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक समितीची बैठक एकाएकी रद्द केली. त्यामुळे उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झालं नाही. याच कारणाने यादी जाहीर होणं लांबलं. काँग्रेसची पहिली उमेदवार यादी उद्या जाहीर होऊ शकते.