व्हायरल व्हिडिओचा ताप, पटोलेंनी सत्ताधाऱ्यांवरच उलटवला डाव; म्हणाले, “त्यावेळी कार्यकर्त्याने..”
Nana patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा (Nana Patole) एक व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नाना पटोलेंचे चिखलात माखलेले पाय त्यांचा कार्यकर्ता धुताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी पटोलेंवर तुफान हल्ला चढवला होता. महायुतीतील नेत्यांनी पटोलेंवर जोरदार टीका केली होती. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच पटोलेंनी सारवासारव करत या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ मी पाहिला. कार्यकर्ता वरून पाणी टाकत होता आणि मी माझ्या हाताने पाय धुत होतो, असे नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना पहिलाच प्रश्न या व्हिडिओबाबत विचारला. त्यावर पटोले म्हणाले, व्हायरल होत असलेला व्हिडिओ मी पाहिलाय. काल अकोला जिल्ह्यातील वाडेगावध्ये मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. संत गजानन महाराज यांची पालखी वाडेगावात मुक्कामी होती. त्या ठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मी पायी निघालो होतो. वाटेत चिखल होता त्यामुळे माझे पाय खराब झाले.
त्यावेळी कार्यकर्ते वरून पाणी टाकत होते आणि मी माझ्या हाताने पाय धुत होतो. माझ्यावर सध्या मीडियाचं जास्त प्रेम आहे. ज्यांचे ईडीने माखले आहेत ते कसे अंधारात कुणाचे पाय धुतात. सरकारमध्येही ईडीने माखलेले अनेक लोक आहेत. ते अंधारात पाय दाबतात, ते अंधारात पाय धुतात हे सुद्धा तुम्ही दाखवा ना असे पटोले प्रसारमाध्यमांना उद्देशून म्हणाले.
Nana Patole : ‘जरांगेंचे आरोप गंभीर, फडणवीसांचीच SIT चौकशी करा’ नाना पटोलेंची मागणी
मी तर तिथं सत्संगासाठी गेलो होतो. वारकऱ्यांना बदनाम करण्याचं काम मागच्या फडणवीस सरकारच्या काळात झालं होतं. तिथं साप सोडण्यात आला होता. लोकांना भीती दाखवण्यात आली होती. वारकरी प्रथेला बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संत गजानन महाराजांची पालखी आली होती. त्यांचं दर्शन घ्यावं. मी दर्शन घेतलं. मी माझं काम केलं. कार्यकर्त्यांनी वरून पाणी टाकलं होतं. ह्यांनी (केंद्र सरकार) तर हर घर में जल, हर नल में जल असा नारा दिला होता ना.. पण जलच नाही. त्यामुळे आता वरूनच पाणी टाकावं लागेल ना, असा खोचक टोला पटोलेंनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
ईडी आणि सीबीआयमध्ये चिखलात माखलेले जे ते तर त्यांचे पाय अंधारात धुतात. मी तर उजेडात धुत होतो. त्यावरही थोडं काम करा. ते ही दाखवत चला. नाना पटोलेंना दाखवा हरकत नाही पण मी तुम्हाला मागच सांगितलं होतं माझं नाव नाना आहे. उलटं करा सरळ करा नानाच दिसणार आहे. त्याचा मला काहीच फरक पडत नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केले.