धाराशिव, अमरावती अन् सिंधुदुर्गातून ‘धनुष्यबाण’ गायब; शिवसेनेतील फूट भाजपसाठी बोनस
Lok Sabha Election 2024 : राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीत अनेक (Lok Sabha Election 2024) मतदारसंघात तिढा निर्माण झाला आहे. मात्र हा तिढा सोडवण्यात महायुतीच्या नेत्यांना हळूहळू यश येत आहे. काल रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातील तिढा सोडवण्यात यश आले. या मतदारसंघात काल भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी मतदारसंघावरील दावा सोडल्यानंतर भाजपने राणे यांची उमेदवारी जाहीर केली. अशा पद्धतीने धाराशिव, अमरावती पाठोपाठ रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा पारंपारिक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागला आहे. या मतदारसंघांमध्ये आता भाजपाच्या कमळ चिन्हावरील उमेदवार रिंगणात आहेत.
Sangli Lok Sabha : कॉंग्रेसच्या हालचाली वाढल्या! विशाल पाटलांची बंडखोरी थांबवू; थोरातांचं वक्तव्य
धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ
धाराशिव मतदारसंघात ठाकरे गटाने विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिले. त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असेल असा प्रश्न होता. या मतदारसंघातून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. यासाठी आधी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्य प्रवेश घडवून आणला. त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. खरंतर या मतदारसंघावर शिंदे गटाचाच दावा होता. परंतु, भाजपने अजितदादांसाठी हा मतदारसंघ शिंदेंकडून सोडवून घेतला. या मतदारसंघात आता राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा उमेदवार आहे.
अमरावतीतील तिढ्यात भाजपला फायदा, धनुष्यबाण गायब
महायुतीत अमरावती मतदारसंघाचा तिढा निर्माण झाला होता. या मतदारसंघावर शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दावा केला होता. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद जास्त आहे. तसेच मागील निवडणुकीचा अपवाद वगळता येथे सातत्याने शिवसेनेचाच उमेदवार निवडून येत होता. त्यामुळे शिवसेनेचा दावाही रास्त होता. परंतु, भाजपने नवनीत राणा यांच्यासाठी हा मतदारसंघ शिंदेंकडून घेतला. राणा या अपक्ष खासदार होत्या. त्यांना तिकीट मिळालं पण यासाठी त्यांनाही भाजपात यावं लागलं. आता नवनीत राणा भाजपाच्या कमळ चिन्हावर अमरावतीच्या मैदानात आहेत.
भाजपाच्या या राजकीय खेळीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सहकारी आमदार बच्चू कडू नाराज झाले. त्यांनी या मतदारसंघात उमेदवार दिला. तसेच अडसूळ गटही नाराज आहे. परंतु, जागावाटपात हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेला स्वतःकडे राखता आला नाही. या मतदारसंघात आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत लढत होणार आहे. मतदारसंघातील नाराजी पाहता आगामी राजकारणात काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Lok Sabha Election : शिर्डीत तिरंगी लढत, उत्कर्षा रुपवते यांना वंचितकडून उमेदवारी
रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिंदेंनी घेतली माघार, राणे भाजपाचे उमेदवार
महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ कळीचा ठरला होता. कोकणात शिवसेनेचा ताकद जास्त आहे. याआधी या मतदारसंघात शिवसेनेचाच खासदार होता. परंतु, तरीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी भाजपने या मतदारसंघावर दावा केला होता. इतकेच काय तर उमेदवारी मिळण्याआधीच नारायण राणे यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत दावा सोडण्यास तयार नव्हते. त्यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यामुळे उमेदवारीचा तिढा निर्माण झाला होता.
महायुतीच्या नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. या बैठकीत काय चर्चा झाल्या याची माहिती समोर आली नाही. परंतु, एकनाथ शिंदे यांनी याही पारंपारिक मतदारसंघावरील दावा सोडला. उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचे बंधू किरण सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी निवडणुकीतून माघार घेत आहेत असे सांगावे लागले. यानंतर लगेचच भाजपने या मतदारसंघातून नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली.