मराठा समाजात फूट? मराठा क्रांती मोर्चाचं कुणबी प्रमाणपत्रावर आक्षेप, मनोज जरांगे पाटलांना थेट चॅलेंज

Maratha Reservation Split Kunbi Certificates : महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या विषयावर नवीन वाद उभा राहिला आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर मराठा क्रांती मोर्चाने मोठा आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा म्हणून आरक्षण मिळावे, असे ठामपणे सांगत मनोज जरांगे पाटील यांना थेट चॅलेंज केलं आहे.
मराठा आरक्षण प्रकरणात नवा वाद
सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण केले. त्यानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटीनुसार जात प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिली आहे. आता मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificates) मिळण्यास सुरुवात झाली आहे.
एकीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असताना, दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने कुणबी-मराठा (OBC) आरक्षणास तीव्र विरोध व्यक्त केला आहे. मोर्चाचे मत आहे की, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच ‘मराठा’ म्हणून आरक्षण मिळावे, कुणबी म्हणून नाही. त्यामुळे या प्रकरणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठा क्रांती मोर्चाचा ठाम विरोध
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, राजकीय पक्ष आणि समाजातील काही व्यक्ती मराठा समाजाला संभ्रमात ठेवण्याचे काम करत आहेत. कुणबी प्रमाणपत्र कधीही रद्द होऊ शकते. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळावे, यात आमचा आक्षेप नाही. मात्र ज्यांच्या जुन्या नोंदींमध्ये ‘मराठा’ असा स्पष्ट उल्लेख आहे, त्यांना आरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे.
सुनील नागणे यांनी स्पष्ट केले की, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले गेले तर ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. अनेक पिढ्यांपासून समाजाची ओळख मराठा असल्याने त्यांना ओबीसी प्रवर्गातून मराठा म्हणून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण मिळाले पाहिजे. जर असे झाले नाही, तर समाजावर मोठा अन्याय होईल.
ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण
राज्य सरकारने जाहीर केलेल्या हैदराबाद गॅझेटबद्दलही मोर्चाचा दावा आहे की, तो फक्त कुणबी म्हणून नोंद असलेल्या लोकांना फायदा करतो; मराठा म्हणून नोंद असलेल्या समाजाला त्याचा लाभ मिळणार नाही. मोर्चाचे म्हणणे आहे की, मराठा म्हणून ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळवण्यासाठी लढाई तेच लढतील. दरम्यान, या भूमिकेमुळे मराठा आरक्षण आंदोलन आता दोन गटांत विभागले गेले आहे. समाजातील विविध मागण्यांमुळे सरकारसमोर हा प्रकरण अधिक संवेदनशील आणि तोडगा काढण्यास आव्हानात्मक बनले आहे.